नारायणगाव-वारूळवाडी हद्दीतील रस्त्याचे काम निकृष्ट

खासदार आढळराव पाटील यांच्याकडे ग्रामस्थांची दर्जेदार कामाची मागणी


माती मिश्रित मुरूम टाकून केले जातेय रस्त्याचे काम

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नारायणगाव – नारायणगाव आणि वारूळवाडी हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची तक्रार नारायणगाव ग्रामस्थांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे गुरुवारी (दि. 27) केली असून रस्त्याचे काम चांगले व दर्जेदार व्हावे अशी मागणी केली आहे.

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी बुधवार (दि. 26) वारूळवाडी ते नारायणगाव एसटी बस स्थानकासमोरील रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने काम बंद केले होते. ही तक्रार सरपंच पाटे यांनी खासदार आढळराव यांच्याकडे केली असता खासदार आढळराव यांनी गुरुवारी (दि. 27) नारायणगाव येथे तातडीची बैठक विश्रामगृहात बोलविली.

या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक कार्यालयातील डेप्युटी जनरल मॅनेजर टेक्‍निकल विभाग ध. नु. झोडगे, टीम लीडर सी. डी. फकीर,असिस्टंट हायवे इंजिनियर डी. के. शिंदे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, संतोष खैरे, रोडवे सोल्युशन इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीचे ठेकेदार संतोष घोलप उपस्थित होते. या बैठकीत आधिकारी व ठेकेदार यांच्याकडून रस्ता रुंदीकरणाची सविस्तर माहिती खासदार आढळराव पाटील यांनी घेतली. यावेळी सरपंच पाटे यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याने काम चुकीच्या पद्धतीने व तांत्रिक बाबी पूर्ण करून होत नसल्याबाबत खासदार आढळराव यांच्याकडे तक्रार केली आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विशेष प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खेड ते नारायणगाव येथील अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील 9.14 किलोमीटर रुंदीकरण रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी 38 कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. खेड व नारायणगाव येथील सध्याचा राष्ट्रीय महामार्ग रस्ता वारूळवाडी येथील बाह्यवळण असलेला 5.373 किलोमीटर रास्ता रुंदीकरण काम सुरू आहे.

वारूळवाडी हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा मुख्य डांबरी रस्ता सोडून काही ठिकाणी 1 ते 2 फूट साईड पट्टी खोदून त्यावर खडी टाकून रोलिंग केले जात आहे आणि त्यात मुरूम न टाकता माती मिश्रित मुरूम टाकून रस्ता तयार केला जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तेथील सुपरवायझर व कामगारांना रस्ता नीट करण्याच्या सूचना केल्या; पण ठेकेदाराने ते काम सुरूच ठेवले. हॉटेल निलयसमोर टाकलेली डांबर दोन दिवसांत खरड होऊन त्यामध्ये खड्डे पडू लागले, तर काही ठिकाणी डांबर व खाडी मिश्रण केलेला रस्ता खराब झाला आहे.

गुरुवारी (दि. 27) सकाळी या ठेकेदाराने बस स्थानकाच्या समोरील महामार्ग रस्त्यावर मशीनद्वारे खाडीमिश्रित डांबर टाकले पण मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी 3 फूट डांबर टाकलेच नाही. अगोदर असलेला रस्ताच ठेकेदाराने कमी केला व त्यावर माती आणून टाकली. ही बाब सरपंच योगेश पाटे यांना स्थानिक नागरिक व व्यवसायिकांनी सांगिल्याने पाटे यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली व संबंधित ठेकेदार घोलप यांना रस्ता चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच ही बाब खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या लक्षात आणून दिली होती, त्यानंतर खासदार आढळराव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर झोडगे, ठेकेदार संतोष घोलप यांना रस्ता चांगला दर्जाचा करण्याच्या सूचना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)