बारामती नगरपालिकेचे सत्ताधाऱ्यांनीच काढले वाभाडे

बारामती – बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमधील त्रुटी निदर्शनास आणत सत्ताधारी नगरसेवकांनी पालिकाप्रशासनाचे सर्वसाधारण सभेत वाभाडे काढले. रस्ते, स्पीडब्रेकर, विकासकामातील दिरंगाई आदींसह ठेकेदारांच्या मनमानीपणाच्या कामकाजाची पोलखोल करीत नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अधिकारी अडखळले. त्यावरुन नगरपरिषदेत प्रशासनाकडून पारदर्शी नाही तर मनमानी पद्धतीने कारभार केला जात असल्याचे आरोप नगरसेवकांनी सभागृहात केले.

बारामती शहरातील विविध सात विषयांच्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे होत्या. सभा सुरू होण्याअधीच शहरातील प्रभागांमध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याची मागणी करीत दलितवस्ती सुधार योजना, बृहंबारामती, रस्ते स्पीडब्रेकर आदी विकासकामांबाबत सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दलितवस्ती सुधार योजनेतील निधी मिळविण्यासाठी प्रशासनाकडून गतिमान कामकाज होत नाही. वेळेत प्रस्ताव दाखल केले जात नाहीत. तांत्रिक मंजुरी देण्यास विलंब केला जात आहे. प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना देखील प्रशासनाला गांभीर्य नाही. ही बाब गंभीर असल्याचे मत गटनेते सचिन सातव यांनी नोंदवले.

जलदगतीने प्रस्ताव दाखल करण्यासाठी गतिमान हालचाली करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाकडे बोट दाखवत नगरसेवक संजय संघवी यांनी अहल्यादेवी होळकार उद्यानाचे काम अद्याप प्रलंबित का, अशी विचारणा केली. संघवी यांनी केलेल्या प्रश्‍नावर अधिकारी अडखळले. या कामाची लगेच पाहणी करतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सत्यव्रत काळे यांनी उघड्यावर असलेल्या केबलच्या जोडमुळे लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शहरातील अशा उघड्या केबलची त्वरीत दुरुस्ती व उपयोजना करण्यात यावी, अशी मागणी केली.

यावर ही बाब गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत दखल घ्यावी, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. वर्कऑर्डर असताना देखील कामांना दिरंगाई होत आहे. रस्त्यांची कामे रखडली आहेत. ठेकेदारांचा मनमानीपणा सुरू असल्याचे नगरसेवक अमर धुमाळ यांनी निदर्शनास आणले. यावर संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना विचारणा करून निर्णय घेतला जाईल, असे अश्‍वासन नगराध्यक्षांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)