कर्वेनगर (प्रतिनिधी) : जी.एम गुलाब भक्ती एंटरप्राइजेस एलएलपी या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने कर्वेनगर येथील गोसावी वस्ती मधील १ हजार २०० गरजवंत कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले. देण्यात आलेल्या किटमध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाच पीठ, एक किलो साखर, एक किलो तूरडाळ, चहा पावडर, तेल पॅकेट अशा सामानाचा समावेश आहे.
गोसावी वस्ती मधील बहुतांश कुटुंबांचे हातावरचे पोट आहे. सध्या लॉक डाऊनमुळे रोजगार नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून कंपनीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संचालक नवीन कोठारी, नगरसेवक जयंत भावे, अनिकेत घरमाळकर उपस्थित होते.
गोसावी वस्ती मधील नागरिकांना कूपन देण्यात आले होते व शंभर कुटुंबांच्या टप्प्यात वेळा देण्यात आल्या होत्या त्या वेळेनुसार कर्वेनगर मधील शैलेश सभागृहात त्यांना हे जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. या नियोजनामुळे किट घेण्यासाठी गर्दी झाली नाही व शासन नियमांचे पालन करत उपक्रम राबवला गेला. कंपनीने राबवलेल्या या उपक्रमामुळे गोसावी वस्ती मधील नागरिकांना आधार मिळाला असून पुढील काही दिवसांची चिंता मिटली आहे.