वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीत चार कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडल्याने अधिकचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन खरात, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासोबत घेतला. कोरोनाच्या सर्व्हेक्षणात संशयित वाटणाऱ्या व्यक्तीची पल्स ऑक्सिमिटर द्वारे तपासणी करण्यासाठी ५० पल्स ऑक्सिमिटरचे वाटप यावेळी करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या व कराव्या लागणाऱ्या उपाययोजना संदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली. यानंतर बीजेएस येथील क्वारंटाइन सेंटर व आयुर्वेदिक महाविद्यालयाला पथकाने भेट देऊन पाहणी केली. बीजेएस येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये संशयित कोरोना रुग्णांच्या स्वॅब टेस्ट घेऊन तपासणीसाठी पुढे पाठविण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाघोलीत कोरोना रोखण्यासाठी होत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, नागसेन लोखंडे, सर्जेराव वाघमारे, वसुंधरा उबाळे, संजय सातव, रामभाऊ दाभाडे, शिवदास उबाळे, रामकृष्ण सातव, सागर गोरे, ग्रामसेवक एम. पी. चव्हाण, कर्मचारी उपस्थित होते.