छत्रपती मालोजीराजे संघाचा डॉ.विश्वजीत कदम संघावर दणदणीत विजय

डॉ. विश्वजीत कदम संघाच्या रोहन सुतार याने छत्रपती मालोजीराजे स्पोर्टस्‌ ऍकॅडमीच्या आदेश गुरवची घेतलेली पकड.

पुणे जिल्हा कबड्डी पुरूष व महिला गट अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धा

पुणे – येथे सुरु असलेल्या जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात पात्रता फेरीच्या अ व ब विभागातून मॉर्डन स्पोर्टस्‌, नवतरूण क्रीडा मंडळ सासवड, कै.पै. आनंता पाडाळे स्पोर्टस्‌, श्रीकृष्ण संघ, भैरवनाथ क्रीडा मंडळ तावशी, सेव्हन स्टार डोरलेवाडी, न्यू सम्राट स्पोर्टस्‌ सुस, अतुलदादा बेनके स्पोर्टस्‌ संघ या आठ संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना पात्रता फेरीतून साखळी सामन्यात प्रवेश केला.

-Ads-

यावेळी झालेल्या पहिल्या सामन्यात छत्रपती मालोजीराजे संघाने डॉ.विश्वजीत कदम संघावर 55-13 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला छत्रपती मालोजीराजे संघाकडे 23-7 अशी आघाडी होती. मालोजी राजे संघाच्या सौरभ आदेवाडकर व आदेश गुरव यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यांना किरण जोशीलकर, कृष्णा बिर्ने यांनी चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

डॉ. विश्वजीत कदम संघाच्या संग्राम बोरकर याने एकाकी झुंज दिली. पर्व क्रीडा संस्था संघाने नवचैतन्य प्रतिष्ठान संघावर 33- 15 असा विजय मिळविला. पर्व क्रीडा संस्थेच्या अजय सोळंकी याने चौफेर चढाया करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला शैलेश पाटील याने उत्कृष्ठ पकडी घेत चांगली साथ दिली. नवचैतन्य प्रतिष्ठानच्या ज्ञानेश्वर राऊत याने चांगला प्रतिकार केला. शिवगर्जना संस्था संघाने जयनाथ क्रीडा संस्था संघावर 39-16 असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला शिवगर्जना संघाकडे 15-3 अशी आघाडी होती. शिवगर्जना संघाच्या ऋत्वीक कलिंदर व प्रसाद चांदेरे यांनी उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिले.

जयनाथ संघाच्या ओंकार भाले याने अष्टपैलू खेळ केला. भरत कोळी याने चांगला खेळ केला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अजिंक्‍य संस्था बारामती संघाने क्रांती क्रीडा संघावर 29-28 असा अवघ्या एक गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळविला. मध्यंतराला अजिंक्‍य संस्था संघाकडे 12-11अशी आघाडी होती. अजिंक्‍य संघाच्या कौस्तुभ लोणकर याने उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला अंशुमन गायकवाड याने उत्कृष्ठ पकडी घेत चांगली साथ दिली.

क्रांती क्रीडा मंडळाच्या अभिषेक व स्वप्नील पवार यांनी चांगला खेळ केला मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. सदर स्पर्धा महाळुंगे (पाडाळे) येथील कै.आनंता पाडाळे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सुरु आहेत.

इतर सामन्यांचे निकाल -अभिजीतदादा प्रतिष्ठान वि.वि. युनिर्व्हसल स्पोर्टस क्‍लब(15-12), वंदे मातरम्‌ वि.वि. मोरया संघ लवळे(35-19), ओम कबड्डी संघ खेड वि.वि. डब्लु,एस.सी. वाघोली(41-15),युवक क्रीडा मंडळ वि.वि. सरनोबत नरवीर पिलाजी गोळे संघ (48-12), शिवाजी व्यायाम मंडळ वि.वि. सह्याद्री क्रीडा संघ(14-13), स्वराज्य संघ कांजळे वि.वि.श्रमदान प्रतिष्ठान (40-19).दिशा प्रतिष्ठान वि.वि. वेताळेश्वर (20-16), शिवनेरी संघ वि.वि. करुंजाई माता प्रतिष्ठान(33-18),अजिंक्‍य संस्था बारामती वि.वि. क्रांती क्रीडा मंडळ (29-28), युवक क्रीडा संस्था वि.वि. सुवर्ण कबड्डी संघ वि.वि. 32-13, काळभैरवनाथ संघ सुस वि.वि. आदिनाथ संस्था बोपखेल( 26-18).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)