पुणे – डायलेसिस, केमोथेरपीच्या रुग्णांत दुप्पटीने वाढ

शहरी गरीब योजनेचा 15 हजारांपेक्षा जास्त जणांकडून लाभ

पुणे – महापालिकेने सुरू केलेल्या शहरी गरीब योजनेंतर्गत रुग्णालयात उपचारांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार आणि डायलेसिस करून घेणाऱ्या रुग्णांमध्ये जवळपास दुप्पटीने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

महापालिकेने 2010 मध्ये शहरी-गरीब योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अत्यंत माफक दरात रुग्णांना उपचार मिळतात. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा खर्च महापालिका देते. तसे पत्रही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णालयांना दिले जाते.

सुरुवातीला या योजनेचा लाभ सुमारे चार-साडेचार हजार नागरिक घेत होते. परंतु, आता ही संख्या 15 हजार पेक्षा जास्त झाली आहे. तसेच, रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे. सुरुवातीला ही तरतूद 1 कोटी रुपये होती ती आता 40 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. आणखी तरतूद लागल्यास विभागाकडून वर्गीकरणही करण्यात येते.

महापालिका रुग्णालयांमध्ये डायलेसिस मोफत करण्यात येते; परंतु महापालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या काही रुग्णालयांमध्ये डायलेसिस आणि केमोथेरपी या दोन्ही गोष्टी माफक दरात केल्या जातात. त्यामुळे या रुग्णालयांकडे जाण्याचा कल वाढला आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

डायलेसिसमध्ये किडनी निकामी झालेले आणि अन्य रोगांमध्ये रक्‍त बदल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. तर केमोथेरपीमध्ये कॅन्सरपिडीत रुग्णांचा समावेश आहे.

अत्यल्पदरात महापालिकेने या सुविधा उपलब्ध करून घेतल्याने रुग्णांना बराच दिलासा मिळाला आहे. ज्या रुग्णांना या दोन्ही उपचारांचा खर्च पेलत नाही, त्यांच्यासाठी हे उपचार संजीवनी ठरल्याची प्रतिक्रिया आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

साल आणि लाभ घेतलेली रुग्ण संख्या
सन 2010 मध्ये 27 डायलेसिस आणि सात केमोथेरपीच्या रुग्णांनी लाभ घेतला. यानंतर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सन 2011-12 मध्येच डायलेसिसच्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली तर, केमोच्या रुग्णांची संख्या सन 2016-17 मध्ये तीन आकडी म्हणजे शतकाच्या घरात गेली. सन 2017-18 मध्ये डायलेसिसच्या रुग्णांची संख्या 409 होती तर केमोच्या रुग्णांची संख्या 275 झाली. 2019 मध्ये 1 ते 30 एप्रिल या एका महिन्यातच डायलेसिसच्या रुग्णांची संख्या 303 तर केमोथेरपी रुग्णांची संख्या 149 होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)