दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकर आणि भावेला एक जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांनाही 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय पुणे कोर्टाने दिला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी दोघांना पुण्यात घेऊन आले होते. रविवारी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

दरम्यान, संजीव पुनाळेकर गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत पुनाळेकर यांचे नाव पुढे आल्याची सुत्रांची माहिती आहे. पुनाळकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे असे आरोप संजीव पुनाळेकर यांच्यावर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोलकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे.

विक्रम भावे हा गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. तसेच तो मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही संबंधित असल्याची माहिती मिळते आहे. पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी फिरायला निघालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)