पुणे – मिळकतकर थकविणाऱ्याचे पाणीच तोडले

पालिकेची कारवाई : रविवारी दिवसभर स्वीकारणार कर

पुणे – महापालिकेचा थकीत मिळकतकर भरण्याचे वारंवार आवाहन करूनही न भरणाऱ्या कात्रज येथील एका थकबाकीदाराचे पाणी तोडण्याची कारवाई पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केली आहे. त्यामुळे इतर थकबाकीदारांनीही त्वरीत कर भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तर, सर्व क्षेत्रीय आणि संपर्क कार्यांलयांत रविवारी दिवसभर कर स्वीकारला जाणार आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मिळकत वसुलीबाबत मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी विशेष मिळकतकर वसुली पथक स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय पाच परिमंडलांमध्ये स्वतंत्र पाच पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांना थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ते मार्चअखेरीस पूर्ण करावयाचे आहे. 1 एप्रिल 2018 ते आजपर्यंत विभागाने मिळकतकरातून 1 हजार 161 कोटी रुपये जमा केले आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्याने वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मिळकत कर थकबाकी पोटी जप्तीसह विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कात्रज येथील संतोषनगर परिसरातील संभाजी रंगनात वाघमारे यांच्या 6 मिळकतींच्या 28 लाख 56 हजार 748 रुपये थकबाकीपोटी त्यांच्या मिळकतींना पाणीपुरवठा करणारे पाणी कनेक्‍शन बंद करण्यात आले आहे. ही कारवाई इतर थकबाकीदारांवरही केली जाणार आहे. याशिवाय ज्या मिळकतधारकांनी थकबाकीसाठी धनादेश दिले आहेत. मात्र हे धनादेश पास झाले नाहीत, अशांवर फैजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जप्तीची व इतर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्वरीत कर व थकबाकी जमा करावी, असे आवाहन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

रविवारी कर स्विकारणार 
आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस रविवार असल्याने त्या दिवसी पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि संपर्क कार्यांलयांमध्ये सकाळी 9.45 ते रात्री8 या कालावधीत मिळकतकराचा भरणा स्विकारण्यात येणार आहे. तसेच सन 2019-20 वर्षातील मिळकतकराची बिले तयार झाली असून ती वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी ती घेऊन जावीत, असेही आवाहन कानडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)