पुणे – बांधकाम राडारोड्याचा बंदोबस्त होणार

पुढील महिनाभरात काम सुरू होण्याची शक्‍यता

पुणे – शहरात निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून वाघोली येथील दगडखाणीमध्ये स्वतंत्र प्रकल्प उभारला जाणार आहे. या खाणीची जागा महापालिकेच्या ताब्यात आली असून त्या ठिकाणी प्रकल्पासाठी लागणारे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने महापालिका तसेच खासगी व्यावसायिकांच्या बांधकाम प्रकल्प तसेच इतर कामांमधून निघालेल्या राडारोड्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात बांधकामांची संख्या वेगाने वाढली आहे. अनेक नवीन बांधकाम करताना तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास करताना मोठ्या प्रमाणात राडारोडा निघतो. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा राडारोडा नदीपात्र अथवा शहरातील टेकड्यांवर टाकला जात असून यामुळे जैवविविधता धोक्‍यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी वाघोली येथील दगडखाण जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. ही खाण अखेर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यानुसार, या ठिकाणी प्रकल्पासाठी यंत्रणा पुढील महिनाभरात उभारून प्रत्यक्षात काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

असा असेल प्रकल्प
या प्रकल्पात प्रामुख्याने बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी काम दिलेल्या कंपनीस महापालिकेकडून “टिपिंग फी’ दिली जाणार असून खासगी बांधकाम व्यावसायिकांनाही पालिकेच्या या सेवेचा लाभ सशुल्क घेता येणार आहे. त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे. या प्रकल्पात आलेल्या राडारोड्याचे आधी वर्गीकरण केले जाणार असून त्यातून वापरता येणारे साहित्य वेगळे केले जाणार आहे. त्यात विटा, लोखंडाचा समावेश आहे. नंतर उरलेल्या राडारोड्याचा चुरा करून त्याच्या पुन्हा विटा तयार करून त्या विक्री करण्यात येणार आहेत. त्यामुळे राडारोड्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यास मदत होणार आहे.

तरच मिळणार पूर्णत्वाचा दाखला?
शहरातील राडारोड्यात सर्वाधिक प्रमाण हे बांधकामाशी संबंधित बाबींचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यासाठीच असणार असून त्यांना बांधकाम परवानगी घेतल्यानंतर राडारोड्याचे काय नियोजन करणार, याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतर ही सुविधा पालिकेकडे असून त्याचा वापर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहे. तर जे व्यावसायिक पालिकेच्या या सुविधेचा लाभ घेतील तसेच जे घेणार नाहीत, त्यांना हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे राडारोडा विल्हेवाट योग्य पद्धतीने लावल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच, अशा बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)