पुणे – नेत्यांच्या मनधरणीसाठी कॉंग्रेसची बैठक?

पुणे – लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना गोंजारणे, नाराज कायकर्त्यांची मनधरणी करणे असे कार्यक्रम सर्वच पक्षात सुरू होत असतात. असाच एक कार्यक्रम आज कॉंग्रेसच्या वतीने राबविण्यात आला आणि तोही चक्‍क कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी.

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये पुणे आणि सांगली मतदार संघ हे कॉंग्रेसकडे आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज या दोन्ही मतदार संघातील जुन्या व जेष्ठ कार्यकर्त्यांशी कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण व हर्षवर्धन पाटील यांनी संवाद साधला. यावेळी सांगलीतील कॉंग्रेसचे नेते विश्‍वजित कदम हेसुद्धा उपस्थित होते. सकाळी पुणे शहर कॉंग्रेसमधील पदाधिकारी व ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली. पुणे शहर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकारी उल्हास पवार व बाळासाहेब शिवरकर यांनी नुकतीच पुणे शहर कॉंग्रेसबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. त्यामुळेसुद्धा आजची चर्चा महत्त्वाची मानली जात होती, या 2 नेत्यांची मनधरणी करण्यासाठी तर ही बैठक नव्हती ना, असाच सूर यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होता. दुसरीकडे सध्या पुणे लोकसभा मतदार संघातून बाहेरच्या उमेदवाराला संधी देणार असल्याच्या बातम्यासुद्धा प्रसिद्ध होत आहेत. त्यात मराठा समाजाचे नेते प्रवीण गायकवाड आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळेसुद्धा या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.

या बैठकी संदर्भात पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही मुद्दे खोडून काढले. ते म्हणाले, कुठल्याही नावाची चर्चा या बैठकीत झाली नाही. त्याचबरोबर नाराजीबाबतही बोलणे झाले नाही. ही बैठकी कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित केली होती. या बैठकीत निवडणुकीबाबतच्या शहरातील समीकरणांबाबतसुद्धा चर्चा झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तर पूर्वीच तयार झाली आहे. ती प्रदेश समितीमार्फत केंद्रीय समितीकडे गेली आहेत. इच्छुकांची नावे खूप आहेत. ही नावे काही प्रमाणात कमी करून एक किंवा दोन नावांवर एकमत करता येईल का? याबाबत चाचपणी करण्यात आली.

पुण्यातील उमेदवारी ही पक्षाच्या बाहेरील उमेदवाराला देणार अशी चर्चा सुरू असल्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, ही चर्चा आमच्या पक्षात नाही, त्याचबरोबर तसा कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. ही चर्चा फक्‍त प्रसिद्ध माध्यमांमध्येच दिसून येत आहे. पुणे मतदार संघ हा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे आम्हीच उमेदवार निवडणार आहोत. राष्ट्रवादी पक्षांशी आमची आघाडी असल्याने उमेदवार निश्‍चित झाला की नक्‍कीच त्यांना प्रथम कळविण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)