पुणे – कॉंग्रेसचा उमेदवार आज ठरणार?

मुंबईत निर्णय : नावाबद्दल आघाडीचे कार्यकर्तेही संभ्रमात

पुणे – लोकसभा निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले असतानाही अद्याप पुण्यात शांतता आहे. असा प्रकार पहिल्यांदाच पुण्यात घडला असून, कॉंग्रेसने अजूनही उमेदवार जाहीर केला नाही. या संदर्भात शनिवारी सकाळी मुंबईत बैठक होणार असून, त्यामध्ये निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्यानंतर पुण्याची जागा कॉंग्रेसला देण्यात आली. वास्तविक पुण्याच्या जागेवर या आधीपासूनच कॉंग्रेसचा दावा होता. त्यानुसार कॉंग्रेसने उमेदवार जाहीर करणे आवश्‍यक होते. भाजपने पुण्यात गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु कॉंग्रेसचा उमेदवाराविषयीचा निर्णय अद्याप झाला नाही. गेल्या तीन दिवसांपासून कॉंग्रेस भवनात कार्यकर्ते उमेदवाराचे नाव घोषित होण्याकडे कान लावून बसले आहेत. उमेदवार कोण? याविषयीचीच चर्चा कॉंग्रेस भवनात रंगू लागली आहे. त्यातून वेगवेगळी नावे समोर येत असल्याने तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले आहे. एक नाव पुढे आले की, काही वेळाने दुसरे नाव पुढे येते असा प्रकार गेले तीन दिवस सुरू आहे. त्यामुळे उमेदवाराच्या नावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कॉंग्रेस उमेदवाराचा निर्णय केंद्राच्या कोर्टात असून, याविषयी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी केंद्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. तेथे बैठक घेऊन पुण्यासह अन्य प्रलंबित उमेदवारीविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुण्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन निवडणुकांची रणनिती आखण्याला सुरूवात केली आहे. कॉंग्रेस भवन येथे या संदर्भात बैठका पार पाडल्या जात असून, बुथ स्तरावर निरीक्षक आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांना सुरूवात झाली आहे.

“बाहेरून उमेदवार आणला, तर प्रचार करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठीही बाहेरूनच कार्यकर्ते आयात करा’ अशी भूमिका निष्ठावानांनी घेतली होती. त्यातून नाव सुचवण्यावरूनही रुसवे-फुगवे झाले होते. मात्र, आता कोणताही उमेदवार दिला तरी त्यांच्यासाठी काम करू असा निर्णय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही संयुक्त पत्रकार परिषदेत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे. 2 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे शनिवारी नाव जाहीर केल्यानंतर लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)