लष्कर, वनविभागाची जागा वगळता 90 टक्के मोजणी : मान्यता मिळविण्याचे प्रयत्न
पुणे – वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तब्बल 7 हजार कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) संयुक्त जमीन मोजणीची 90 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
संरक्षण विभाग आणि वन विभागाच्या काही जागेचा अपवाद वगळता बहुतेक सर्व जागांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले असून, येत्या आठवडाभरात त्याचे नकाशे आणि अहवाल महापालिकेला प्राप्त करून दिला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी खासगी तसेच शासकीय विभागांच्या नेमके किती भूसंपादन करावे लागणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या रस्त्यासाठीच्या जागेत सुमारे 40 टक्के पालिकेकडे असून 24 टक्के खासगी तर 36 टक्के शासकीय विभागांची जागा आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 36 किलोमीटरचा हा संपूर्ण उन्नत रस्ता विकसित केला जाणार आहे. या मार्गासाठी पालिकेला विविध सरकारी विभागांची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी 3 मेपासून पालिका आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांमार्फत सुरू केली आहे. हे काम अवघ्या 15 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून ही मोजणी 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती उपायुक्त आणि “एचसीएमटीआर’च्या नोडल ऑफिसर वनश्री लाभशेटवार यांनी दिली. सोबतच संरक्षण विभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.
संरक्षण मंत्रालयाची परवानगी आवश्यक
या रस्त्यासाठीची काही जागा लष्कराच्या मालकीच्या जागेत आहे. त्यामुळे महापालिकेने या जागेची मोजणी करण्यासाठी संरक्षण विभागाशी आधीच पत्रव्यवहार सुरू केला आहे. लष्कराच्या जागेचे लॅन्ड रेकॉर्डची माहिती तसेच मोजणीची यंत्रणा ही लष्कराच्याच ताब्यात असते. त्यासाठी आधी संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेने या परवानगीसाठी पत्र पाठविले असले, तरी अद्याप पालिकेस ही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही जागा वगळून मोजणी करण्यात आली असून लष्कराच्या मोजणीसाठीही महापालिकेकडून पत्रव्यवहार सुरू असल्याचे लाभशेटवार यांनी स्पष्ट केले.