पुणे – ब्रिजेश दीक्षितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

पुणे – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दि.13 मार्च रोजी मेट्रोसंदर्भात पत्रकार परिषद घेतल्याने त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आली. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या निर्देशानुसार डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दीक्षित यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता पथक प्रमुख प्रशांत मोहन खताळ यांनी फिर्याद दिली आहे. दि.10 मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यावर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दि.13 मार्च रोजी घोलेरोड येथील महामेट्रो कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यानुसार दिक्षित यांनी पुणे मेट्रो ही नागपूर मेट्रोपेक्षा अधिक गतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. तसेच डिसेंबरअखेर कमीतकमी एका लहान विभागात (प्रायोरिटी सेक्‍शन) तरी चालवण्याबाबत घोषणा करुन पुण्यातील मेट्रोच्या प्रगती बाबतचा आढावा जाहीर केला. निवडणूक आचारसंहितेदरम्यान कोणतीही आश्‍वासने देण्यास मनाई केलेली असताना मेट्रोच्या प्रगतीचा आढावा जाहीर केला. त्यामुळे दीक्षित यांच्याविरोधात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.

मेट्रोच्या डब्यातूनही प्रचार
बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आलेल्या मेट्रोच्या डमी डब्याद्वारे भाजपचा प्रचार करण्यात येत असल्याची तक्रार गनिमीकावा युवा संघाचे संजय वाघमारे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली आहे. मेट्रोची माहिती देण्याचे सांगत तेथे तीन टीव्हीस्क्रीन बसविण्यात आले असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा प्रचार सुरू असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)