पुणे – आचारसंहिता म्हणजे ‘नो वर्क’?

नागरी कामांना महापालिका अधिकाऱ्यांची “ना’

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली महापालिकेत अक्षरश: “अघोषित बंद’चे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतेही काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना “आचारसंहिता असल्याने कामे होणार नाहीत’ असे मोघम उत्तर देऊन घालवून दिले जाण्याचा प्रकार घडत आहे.

आचारसंहिता म्हणजे “नो वर्क’ असे समीकरण अधिकाऱ्यांनी तयार केल्याने महापालिकेत शुकशुकाट दिसून येत आहे. लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर कोणती कामे केली जातात आणि कोणती नाहीत याची जाण सर्वसामान्य नागरिकांना नसते. हे लोक वैयक्तिक कामे घेऊन महापालिकेत येतात. अधिकारी जागेवर नसल्याने ते तासनतास अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर बसून राहतात. कधीतरी दोन-चार तासांनी अधिकारी कार्यालयात उगवतात परंतु “आचासंहिता आहे, काम होणार नाही’ असे कारण देऊन ते काम टाळले जात आहे.

या सगळ्या प्रकारामुळे महापालिकेत सुट्टीचेच वातावरण असून, जोडून सुट्ट्या आल्याने त्यात आणखी भर पडली आहे. गुरूवारची धुलिवंदनची सुट्टी त्यानंतर शुक्रवार कामाचा दिवस आणि शनिवार, रविवार सुट्टी यामुळे सुट्टीचा “मूड’ त्यातून आचारसंहितेचे कारण असल्याने अधिकाऱ्यांचे फावले आहे. साहेबच नसल्याने कर्मचाऱ्यांवरही कोणतेच अंकुश राहिले नाही. त्यामुळे त्यांच्यामुखीही अशीच उत्तरे नागरिकांना ऐकावी लागत आहेत.

अत्यावश्‍यक सेवांवरही परिणाम
प्रत्यक्षात अत्यावश्‍यक सेवांचे कामकाज आचरसंहितेतून वगळण्यात आले आहे. असे असतानाच, आरोग्य, पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज तसेच इतर काही विभागांचे कर्मचारी महापालिकेतून गायब होत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ होत आहे. त्यातून मार्चमध्येआधीच शासकीय सुट्ट्यांची संख्या जास्त असल्याने, त्याला जोडून येणाऱ्या दिवसांमध्ये हे अधिकारी आचारसंहितेचे नाव पुढे करत गायब होत असल्याने अत्यावश्‍यक सेवांवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)