पुणे – सीएनजी गाड्यांचेही चाक मार्गात ‘पंक्‍चर’

दररोज 100 बसेस मार्गात बंद : पीएमपीएमएलसमोर नवे संकट

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चाक खोलात रुतलेले असताना, ते अजूनच गाळात सरकत आहे. दररोज किमान शंभरीच्या घरात बस बंद पडत असताना, यामध्ये “गॅस’ संपल्याने बंद पडणाऱ्या बसेसची दिवसेंदिवस भर पडत आहे.

इंजिनमध्ये बिघाड होणे, ब्रेक फेल असणे, गिअरबॉक्‍समध्ये बिघाड होणे, चाक पंक्‍चर होणे आदी कारणांमुळे दरदिवशी सुमारे शंभरच्या आसपास बस बंद पडतात. यामध्ये आता “सीएनजी’ संपल्यामुळे बंद पडणाऱ्या बसेसचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीमध्ये भर पडत आहे. रस्त्यात बस बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वारंवार असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सीएनजीवर 33 लाख रुपये खर्च
पीएमपीएमएलकडे असणाऱ्या बसेसना “एमएनजीएल’ कंपनीकडून सीएनजी पुरवला जातो. एकूण बसेसपैकी सुमारे 1 हजार 250 बसेस सीएनजीवर धावतात. त्यापैकी 673 बसेस पीएमपीएमएलच्या मालकीच्या तर 577 बसेस ठेकेदारांच्या आहेत. या सर्व बसेससाठी दररोज जवळपास 60 हजार किलो सीएनजीसाठी प्रशासन 33 लाख रुपये खर्च करत आहे. इतका खर्च करूनही सीएनजीवर चालणाऱ्या बसेस बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

बसमधील शिल्लक सीएनजीची तपासणी न करता मार्गावर
रात्रीच्या फेऱ्या संपवून बस डेपोमध्ये लावताना सीएनजी भरणे आवश्‍यक असते. दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या फेऱ्यांमधील चालकांनी गॅस भरल्याची खात्री करून बस मार्गावर न्यावी. त्याचबरोबर संबंधित बसचालकाने देखील बसमध्ये किती सीएनजी शिल्लक आहे, याची तपासणी करणे आदी सूचना चालकांना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, या घटनांबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)