पुणे – ‘टिओडी’ला मुख्यसभेत एकमुखाने मंजुरी

पुणे – शहरातील “उच्च क्षमता वाहतूक द्रुतगती मार्ग’ (एचसीएमटीआर) या प्रकल्पाच्या 500 मीटर परिसरात “टीओडी पॉलीसी’ (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंन्ट) राबवण्याला मंजुरी देणारा प्रस्ताव महापालिका मुख्यसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आला. याविषयी अनेक प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले. मात्र, महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात खुलासा केल्याने हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला.

हा मार्ग 35.96 किमी लांबीचा आहे. यासाठी मे. स्तूप कन्सल्टंट यांची आराखडा तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार या कामात सहा मार्गिका प्रस्तावित असून, त्यामध्ये दोन मार्ग बीआरटीसाठी आणि चार मार्ग खासगी वाहनांसाठी प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 5096 कोटी रुपये धरण्यात आला होता. याशिवाय भूसंपादनासाठी 1550 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. एकूण योजनेचा खर्च 6646 कोटी धरण्यात आला होता. मात्र, गेलेला कालावधी लक्षात घेता या प्रकल्पखर्चात वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. याविषयी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सभागृहात माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, हा प्रकल्प मंजुर करण्याची घाई केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तसेच “टीओडी’ला परवानगी दिल्यास वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मुलभूत गरजा भागवणे महापालिकेला शक्‍य होणार आहे का? असे अनेक प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले.

केंद्राने “नॅशनल ट्रान्झिट ओरिएन्टेड पॉलिसी’ जाहीर केली आहे. त्यानुसारच “ट्रान्झिट ओरिएन्टेड कॉरिडॉर’ विकसित केले जाणार आहे. त्यासाठीच “टीओडी’ आवश्‍यक आहे. त्यामुळे मेट्रोच्या धर्तीवरच “एचसीएमटीआर’च्या मार्गाच्या दोन्ही बाजूचा पाचशे मीटरचा परिसर टीओडी क्षेत्र म्हणून निर्देशित करण्यासाठी हा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर करून तो राज्य सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. त्यानुसार तो मंजूर करण्यात आला.

आयुक्त सौरभ राव यांचा मुख्यसभेतील खुलासा
हा प्रकल्प 1987 पासूनचा आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या तीस वर्षांत झाली नाही. मात्र आता याचा प्रस्ताव अत्यंत विचारपूर्वक करण्यात आला आहे. अडीच ते तीन महिने यावर बारकाईने अभ्यास केला आहे. याविषयीचा तपशीलवार प्रस्ताव पुन्हा सादर करणार आहेच परंतु आता प्राथमिक स्वरुपात “टीओडी’चा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यसभेपुढे आणण्यात आला आहे. टीओडी व्यतिरिक्त अनेक पर्यायांचा विचारही करण्यात आला आहे. नॅशनल रोड अॅथॉरिटी, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी यांच्याशीही या विषयावर तांत्रिकदृष्ट्या चर्चा झाली आहे. या प्रकल्पाचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे ती तरतूद कशाप्रकारे उभी करायची याचाही विचार सुरू असून, या रस्त्यापासूनही उत्पन्न मिळणे आवश्‍यक असल्याने त्या मार्गांचाही विचार सुरू आहे. जेथे मेट्रो आणि एचसीएमटीआर रस्त्याचा टीओडी झोन क्रॉस होतो तेथे महसूल वाटून घेतला जाईल. तसेच या प्रकल्पाला वनविभाग, संरक्षण विभाग आणि अन्य काही विभागांच्या परवानग्याही घ्यायच्या आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)