पुणे – आता दर तीन महिन्यांनी स्वच्छतेचे रॅकिंग

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केंद्र सरकारकडून बदल

पुणे – स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत केंद्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्वच्छ शहर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांमध्ये स्वच्छता विषयक कामकाज संपूर्ण वर्षभर सुरू राहावे, यासाठी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे स्वच्छता मानांकन प्रत्येक तीन महिन्यांनी जाहीर केले जाणार आहे. या पूर्वी हे मानांकन प्रत्येक वर्षी मार्चमध्ये जाहीर केले जात होते. स्पर्धेत सहभागी होणारी शहरे स्पर्धेच्या काही महिने आधीच तयारी करत असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राकडून या स्पर्धेच्या निकषांत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत अभियान या महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यात मोठ्या शहरांसाठी स्वच्छ शहर स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत या पूर्वी प्रत्येकी 5 हजार गुणांचे पाच निकष होते. तसेच जानेवारीत ही स्पर्धा होत असे. त्यामुळे अनेक शहरे दिवाळीनंतर या स्पर्धेची तयारी करत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेऊन केंद्राने आता प्रत्येक तीन महिन्यांसाठी ही स्पर्धा घेण्याचे निश्‍चित केले आहे. प्रामुख्याने चार निकषांवर ही स्पर्धा असणार आहे. त्यात पहिला निकष हा स्वच्छता स्पर्धेचा असून प्रत्येक तीन महिन्यांनी शहराचे स्वच्छता मानांकन जाहीर केले जाणार आहे. तर वर्षाच्या अखेरीस या चारही मानांकनाच्या गुणानुसार, अंतिम मानांकन दिले जाणार आहे.

दुसरा निकष हा प्रत्यक्ष शहराची परीक्षकांकडून पहाणी, तिसरा निकष नागरिकांचा सहभाग, तर चौथा निकष हा कागदपत्रांच्या पूर्ततेचा असणार आहे. त्यानुसार, सुमारे 5 हजार गुणांची ही स्पर्धा असणार आहे. या पूर्वी हे सर्व निकष वर्षाच्या अखेरीस पूर्ण केले जात होते. मात्र, यावर्षीपासून प्रत्येक तीन महिन्यांनी त्याची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाचाही समावेश
या वर्षीपासून या सर्वेक्षणात केंद्राकडून शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापनाचाही समावेश करण्यात आला आहे. या शिवाय, शहरातील नैसर्गिक जलस्रोतांची स्वच्छता, त्यांच्या संवर्धनासाठी संबंधित शहराकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना, नदी सुधारणा याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ स्वच्छतेवर लक्ष न ठेवला आता या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांना या घटकांच्या स्वच्छतेवरही लक्ष द्यावे लागणार आहे. या शिवाय, शहरातील शाळा, हॉटेल, मोठ्या सोसायट्या तसेच कचरा निर्मिती करणाऱ्या वेगवेगळया घटकांसाठी स्वच्छता स्पर्धांसह जनजागृती करण्यावरही या निकषांमध्ये भर देण्यात आला असून मोठ्या प्रमाणात गुण निश्‍चित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)