पुणे शहरात जाणवतोय रक्ताचा तुटवडा

बिबवेवाडी – खरे तर पुणे तेथे काय उणे अशी म्हण आहे; परंतु प्रत्येक उन्हाळ्यामुळे पुणे तेथे रक्त उणे अशी म्हणायची वेळ येते. पुणे शहरामध्ये उन्हाळामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी रक्तकमी पडत आहे. रक्त मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळण्यासाठी अनेक रक्तपेढ्यांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रक्‍तदान करण्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती होणे गरजेचे आहे.

रक्तदानाबाबत गैरसमज
उन्हाळ्यात रक्तदान केल्याने आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो व उष्णतेचे प्रमाण जास्त जाणवत असल्याने रक्तदान केल्यास आपली तब्येत खालावेल असा गैरसमज अनेक नागरिकांमध्ये दिसून येतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांकडे नागरिक पाठ फिरवतात. हे रक्तपुरवठा कमी होण्याचे एक मुख्य कारण दिसून येते. खरे तर डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात देखील इतर ऋतुंप्रमाणेच रक्तदान केल्यानंतर काही काळातच पुन्हा नवीन रक्त आपल्या शरीरात तयार होते. याबाबत जनजागृती करून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याची आवश्‍यकता आहे.

सुट्ट्यामुळे परिमाण
रक्त पेढ्यांचा मोठा स्तोत्र म्हणजे महाविद्यालयीन तरुण-तरुणी हाच असतो. मात्र, जवळपास महाविद्यालयांच्या सुट्ट्या चालू असल्याने हा स्तोत्रही फारच कमी झाला आहे. बहुतांश रक्तदाते हे कॉलेजचे तरुण-तरुणी असतात. पुण्यात बाहेर गावांवरून शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थीच जास्त आहेत. ते परीक्षा संपल्यामुळे या काळात आपापल्या गावी सुट्ट्यांसाठी निघून गेलेले असतात. त्यामुळे देखील खूप तुडवडा भासत असतो. या काळात रक्तदान कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे उन्हाळी सुट्ट्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. या काळात रक्तदान शिबिर भरविणारे देखील आणि रक्तदाते सुद्धा बाहेरगावी गेल्यामुळे रक्त मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. सध्या पुण्यातील सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये संलग्न ब्लड बॅंका व सर्व ब्लड बॅंकमध्ये रक्ताची गरज लागत आहे. रक्ताचा तुटवडा शहरात भेडसावतोय अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्याची देखील आहे. या काळात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे.

रक्तदान हे श्रेष्ठ दान समाजले जाते, परंतु रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच सर्व ब्लड बॅंकांनी आपापसात संवाद ठेवणे गरजेचे आहे. रक्तदात्याला रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
– राम बांगड, रक्ताचे नाते संस्थेचे अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)