घरफोड्या करण्यासाठी आलीशान कार; पाच वर्षात केले तब्बल 88 गुन्हे

घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे – महागड्या कारमधून येवून घरफोड्या व चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 15 गुन्हे उघडकीस आले असून 18 लाख 45 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दोघाही आरोपींनी मागील पाच वर्षात चोरी व घरफोडीचे तब्बल 88 गुन्हे केले आहेत. घरफोडी करण्यासाठी त्यांनी चोरीच्या पैशातून आलीशान शेओरलेट कॅप्टीव्हा कार खरेदी केली होती.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड(32,रा.डिपी रोड , औंध) , नितीन उर्फ हुबळया शंकर जाधव(25,रा.सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे , पोलीस नाईक अशोक गवळी, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे यांना पेट्रोलिंग करत असताना दोन्ही आरोपींबद्दल माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोघांनाही सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा व रात्री घरफोड्या तसेच बसमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली.

…सुटाबुटात करायचे चोरी 

दोघाही आरोपींनी चोरीच्या पैशातून आलिशान कार खरेदी केली होती. चोरी करण्यासाठी ते या कारमधून सुटा-बुटात येत असत. त्यांची कार सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार नाही अशी पार्क करत होते. यामुळे सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना त्यांचा संशय येत नव्हता व पोलिसांनाही त्यांचा माग लागत नव्हता.यातील जयवंतवर आजवर चोरी व घरफोडीचे 88 गुन्हे दाखल आहेत. तर नितीनवर चोरी व दरोड्याचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल आहेत. या दोघांचीही ओळख येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना झाली होती. बाहेर पडल्यावर दोघांनीही एकत्र काम करण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये 84 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 ग्रॅम चांदी, 97 हजार रोख, एक एलसीडी व शेओरलेट कार असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त(परिमंडळ 4) प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी अशोक गवळी, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, पंकज मुसळे, हणमंत जाधव, समिर भोरडे, अजय पाडोळे, बहिरट यांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)