पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे- लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

नितीन प्रकाश सुर्यवंशी (वय 21, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 17 वर्षीय मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. नितीन याने 19 जानेवारी 2016 रोजी पीडित मुलीला चिंचवड परिसरातून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील एका गावात पळवून नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 363 (पळवून नेणे) नुसार तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड, भादवी कलम 366 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 नुसार 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)