पुणे – रस्त्यालगत झाडे नसल्याने नागरिकांची होरपळ

बाकीचे प्रकल्प सोडून आधी रस्त्यांवर सावली देणारी झाडे लावण्याची मागणी

पुणे – “शहरातील उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. अशामध्ये दुचाकींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वृक्षाच्छादनच नसल्याने या रस्त्यांवर सावलीच नाही. अशा परिस्थितीत दुचाकी चालविणे अथवा रस्त्यांवरून पायी चालताना नागरिक हैराण झाले असून, बाकी सगळे प्रकल्प सोडा आधी रस्त्यांवर सावली देणारी झाडे लावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील सेनापती बापट रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, गणेश खिंड रस्ता, सोलापूर रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांवरून फिरत असताना नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. या रस्त्यांची रूंदी जास्त आहे, तसेच याठिकाणी सिग्नलची संख्यादेखील जास्त आहे. मात्र, रस्त्यांवर सावली नसल्याने तसेच अनेकदा वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर बराच वेळ थांबावे लागत असते. इतकेच नव्हे, तर उन्हाच्या त्रासामुळे आरोग्याच्या समस्याही उद्‌भवत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्याऊलट बाणेर रस्ता, जंगली महाराज रस्ता, लष्कर परिसरातील रस्त्यांवर ज्याठिकाणी वृक्षाच्छादन आहे त्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांना कमी त्रास होतो. त्यामुळेच शहरातील इतर विकास प्रकल्प सोडा, पण आधी सर्व रस्त्यांवर सावली देणारे वृक्ष लावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

“वृक्षारोपण, संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे यावे’
याबाबत वृक्षप्रेमी विनोद शहा म्हणाले, “रस्त्यांचे बांधकाम करतानाच रस्त्यांच्या दोन्ही बाजूस तसेच रूंदी जास्त असलेल्या रस्त्यांच्या मध्यभागी देखील स्थानिक प्रजातींचे वृक्ष लावले जावे, असा कायदा पर्यावरण मंत्रालयाने केलेला आहे. विशेषत: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी हा कायदा बंधनकारक आहे. मात्र, आज शहरातील रस्त्यांच्या बाबतीत या कायद्याचे योग्यप्रकारे पालन केले जात नाही. उलट पूर्ण वाढ झालेली जुनी झाडे विकास प्रकल्पासाठी तोडली जात आहेत. त्यामुळेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. हा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनीदेखील जबाबदारीने पुढे येऊन वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)