पुणे चिंब; रात्रीपासून संततधार

– राज्यातही पावसाच्या जोरदार सरी
– पुढील दोन दिवसही पावसाचेच

घाटमाथ्यावर जोर वाढला

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे फेसाळणारे धबधबे सुरू झाले आहे. हे दृश्‍य पाहण्यासाठी आणि पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी ताम्हिणी, लोणावळा यासह अन्य डोंगराळ भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. अम्बोने घाटात सर्वाधिक 180 मिमी पावसाची नोंद झाली असून, दावडी येथे 170, ताम्हिणी घाट-150, लोणावळा-110, कोयना, भिवपुरी, खोपोली परिसरात प्रत्येकी 90 आणि बळवण येथे 70 मिमी पावसाची नोंद झाली.

पुणे – राज्यात मान्सून सक्रीय झाल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पुणे शहरातही गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून, शनिवारची (दि. 6) सकाळ जोरदार पावसाच्या सरींनी झाली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार यामुळे रस्त्यांवर पाणी-पाणी झाले होते. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात पावसाच्या जोरदार सरी पडतील, अशी शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरात झालेल्या धुव्वाधार पावसाने जूनची सरासरी भरून काढली. मात्र, जुलैला सुरूवात झाली आणि शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे पुढील आठ दिवस पावसात खंड पडणार अशी शक्‍यता असताना शुक्रवारी (दि. 5) रात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली. आज सकाळपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, वारजे, औंध, कात्रज, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, सिंहगड रोड खडकवासला या भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कर्वे रस्ता, स्वारगेट, नवले पूल, कात्रज यासह अन्य भागातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले.

दरम्यान, मान्सून सक्रीय झाल्यामुळे गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. माथेरान येथे सर्वाधिक 210 मीमी पावसाची नोंद झाली. दोडामार्ग येथे 140, उल्हासनगर येथे 130, कर्जतमध्ये 120, पनवेल, खालापूर आणि महाबळेश्‍वर येथे प्रत्येकी 110, भिरा येथे 100, खेड, मंडणगड आणि लोणावळा येथे प्रत्येकी 90 मीमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)