महापालिका करणार व्हॉट्सऍप ग्रूपद्वारे जनजागृती
पुणे – शहरातील नदी संवर्धन तसेच स्वच्छतेसाठी महापालिकेकडून शहरातील धार्मिक संस्था, धार्मिक विधी करणाऱ्या व्यक्ती, मंदिराचे व्यवस्थापक तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच त्यांची बैठक घेतली जाणार असून त्यांचे व्हॉट्सऍप ग्रूप केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यात कशा प्रकारे नदी स्वच्छता ठेवली जाईल, यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ते कमी करण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढतच असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने नदी सुधारणेसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत नुकतीच महापालिकेत एक बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उपस्थित असलेल्या पर्यावरण संस्थाच्या प्रतिनिधींनी शहरातील धार्मिक संस्था, धार्मिक विधी करणाऱ्या व्यक्ती, मंदिराचे व्यवस्थापक तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने या घटकांची बैठक घेण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागास दिल्या आहेत. त्यानुसार, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही बैठक घेतली जाणार असून या सर्व संबंधितांचे मोबाइल क्रमांक संकलित करून त्यांचा व्हॉट्सऍप ग्रूप केला जाणार आहे. या ग्रूपच्या माध्यमातून नदी स्वच्छतेची माहिती तसेच घेण्यात येणाऱ्या उपक्रमात या घटकांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.