पुणे – सिमेंट रस्त्यासाठी जलवाहिनी फोडून “पाणीचोरी’

आयुक्तांच्या आदेशाला पथविभागाचा ठेंगा


अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मुख्य रस्त्यावरील प्रकार

पुणे – पाणी कपात आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पुणेकरांच्या घशाला कोरड पडलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमसमोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यासाठी चक्क पालिकेच्या जलवाहिनीला “टॅब’ मारून पाणीचोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्तांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच लेखी आदेश काढून “सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही’ याची तपासणी तसेच खबरदारीचे काम पथ विभागाकडे सोपविले आहे. मात्र, पथ विभागाचे “कुंपणच शेत खात’ असल्याचे समोर आले आहे.

खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षापेक्षा यंदा 20 टक्‍के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे दिवाळीपासूनच एकवेळ पाणीकपात लादण्यात आली आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागही वारंवार पाणी बचतीबाबत पत्र पाठवित आहे. बचत न केल्यास पाणीकपातीचे संकट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असतानाच; महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी थांबत नसल्याचे चित्र आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच प्रवेशद्वारापासून सारसबागेकडे जाणाऱ्या सुमारे 100 मीटर लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे. त्यासाठी पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे वापरण्यात येत असल्याचे समोर आले होते. मात्र, ही बाब बाहेर आल्याने आता ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी थेट जलवाहिनीलाच “टॅब’ मारला असून त्यातून पिण्याचे पाणी रस्त्यासाठी वापरण्यात येत आहे. अशा प्रकारे दिवसातून दोन ते तीन वेळा हजारो लिटर पाणी वापरले जात आहे.

पथ विभाग झोपा काढतोय का ?
महापालिका आयुक्तांनी पाणी बचतीसाठी शहरातील सर्व नवीन सिमेंट रस्त्यांच्या कामांना बंदी घातली होती. मात्र, नगरसेवकांनी त्यास विरोध केल्याने आयुक्तांनी ही बंदी मागे घेतली. मात्र, त्याच वेळी या रस्त्यांसाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातीलच पाणी दिले जावे,असे आदेश दिले. तसेच रस्ते बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही, याचे लेखी हमीपत्र संबंधित ठेकेदराकडून पथ विभागाने घेऊन भविष्यात पिण्याचे पाणी वापरले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच पाण्याचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत. मात्र, स्वारगेटसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर हा पाणीचोरीचा प्रकार राजरोसपणे सुरू असतानाच; पथ विभागाकडून काहीच केले जात नसल्याने पथ विभाग काय झोपा काढतोय का? असे म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

आयुक्त साहेब लक्ष देणार का ?
महापालिका पाणी बचत करते हे दाखविण्यासाठी आयुक्तांनी जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर बंद करण्यासह सिमेंट रस्त्यांबाबत लेखी आदेश काढले. पण, या आदेशाची अंमलबजवणी झाली का? पाण्याचा गैरवापर होतो किंवा नाही? याचा साधा आढावाही पथ तसेच पाणीपुरवठा विभागानेही घेतलेला नाही. त्यातच, पदपथ आणि सिमेंट रस्त्यांची कामे ठिकठिकाणी सुरू असून त्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे आयुक्त केवळ आदेशच काढणार? त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)