पुण्याचा उमेदवार तीन दिवसांत जाहीर होईल

पालकमंत्री गिरीश बापट : जिल्ह्यातील सर्व जागा जिंकणार

पुणे – पुण्यातील भाजपचा उमेदवार कोण, याबाबतची गुप्तता कायम ठेवत येत्या तीन दिवसांत उमेदवार जाहीर होईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल, त्याच्यामागे एकदिलाने उभे राहू, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री बापट यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या विविध कामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. यानिमित्त बापट यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे लोकसभा भाजप उमेदवाराबाबत बापट म्हणाले, “सध्या पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आम्ही शिस्तीच्या पक्षात वाढलो आहोत. त्यामुळे उमेदवार कोणी असेना आम्ही सर्व भाजप पदाधिकारी व नेते एक दिलाने काम करू. पुणे शहरातच नाही, तर जिल्ह्यातही सर्व जागा जिंकून आणू असा विश्‍वास आहे.’ आपण स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहोत, की नाही? याबाबत मात्र खुलेपणाने बोलणे बापट यांनी यावेळी टाळले. ते म्हणाले, “मी माझी इच्छा पक्षाकडे व्यक्त करतो, सार्वजनिकपणे नाही. आमचे पक्षनेतृत्व इतके सक्षम आहे, की ते योग्य विचार करतील. त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचे काम आम्ही एक दिलाने करणार.’

भाजप-शिवसेनेमध्ये चांगला समन्वय आहे. आम्ही दोघे एकाच विचाराने बांधलेले आहोत. त्यामुळे आमेच मनोमिलन पूर्वीपण होते आणि आता तर ते आणखी घट्ट झाले आहे. मावळची जागा ही युतीची आहे आणि युतीच जिंकणार हे निश्‍चित आहे. शिरुर मतदारसंघाचा मी कालच मेळावा घेतला. याला सहापैकी पाच आमदार उपस्थित होते. त्यामुळे या मतदार संघातसुद्धा विजय आमचा होणार आहे.

मतदान आणि पाणी कपातीचा कुठलाही संबंध नाही. पुणे शहराच्या पाण्याबाबतचे नियोजन झाले आहे. सध्याची जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, पुणे परिसरात यंदा झालेला कमी पाऊस ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे.

बारामतीचा “सस्पेन्स’ लवकरच संपणार
बारामती लोकसभा मतदार संघाबाबत बापट म्हणाले, “यंदा आम्ही या मतदार संघातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हांवर लढविणार आहोत. उमेदवार कोण असेल, हे तुम्हाला लवकरच कळेल. यंदा बारामतीसाठी पक्षाने मोठा “प्लॅन’ आखला आहे, असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)