पुणे – मेट्रो कर्मचाऱ्यांच्या संवादासाठी ‘सी-डॅक’ देणार तंत्रज्ञान

पुणे – मेट्रो रेल्वेत कर्मचाऱ्यांना अंतर्गत संवाद साधण्यासाठी नवीन संगणक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टिम सेंटर फॉर डेव्हपलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंग (सी-डॅक) तर्फे विकसित केली जात असल्याची माहिती महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.

नव्याने उदयास येत असलेल्या प्रगत संगणक शास्त्र या विषयावर दि.4 आणि 5 एप्रिलदरम्यान विशेष परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. दरबारी यांनी सांगितले. सी-डॅककडून विकसित करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती या परिषदेमध्ये दिली जाणार आहे.

एक्‍सएस्केल संगणक तंत्रज्ञान, मायक्रोप्रोसेस्ड तसेच क्वॉंटम संगणक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच भाषाधारित संगणक तंत्रज्ञान आदी विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

डॉ. हेमंत दरबारी म्हणाले, नीति आयोग, सी-डॅक, डीआरडीओ, आयआयएससी, आयआयटी, एआयआयएमएस, विविध संशोधन संस्था आणि खाजगी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअप यांच्या सहकार्यातून भारताला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे समाधान शोधणाऱ्या संशोधनाला चालना देणे हा या उपक्रमामागचा हेतू आहे.

विविध विषयांवर संशोधन सुरू
सी-डॅककडून सध्या स्वदेशी एचपीसी तंत्रज्ञान, उत्पादने आणि उपाय, ऍप्लिकेशनचा विकास, संशोधन आणि विकास, मानव संसाधन विकास यातील संशोधनामध्ये कार्यरत आहे. सी-डॅक तर्फे एक्‍सस्केल कॉप्युटिंगच्या दृष्टीने हवामानाचा अंदाज, संगणकीय जैवशास्त्र, मॉलिक्‍युलर डायनॅमिक्‍स, अवकाश अभियांत्रिकी, भूकंप विश्‍लेषण, नॅनो शास्त्र, खगोल-भौतिक शास्त्र, आर्थिक अनुकरण, बिग डेटा विश्‍लेषण यावर काम केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)