पुणे – दररोज 4 हजार रुपये आणाच; पीएमपी वाहक, चालकांना “टार्गेट’

पुणे – दररोज किमान चार हजार रुपये न आणणाऱ्या वाहक आणि चालकांवर दंडात्मक तसेच अन्य स्वरुपाची कारवाई करण्याचा फतवा “पीएमपीएमएल’ प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे हे वाहक आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र, मेट्रो कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार बसमध्ये होणारे बिघाड यामुळे हे उत्पन्न मिळविताना वाहक आणि चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेल्या काही वर्षांत “पीएमपी’ च्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे, त्यामुळे महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी, प्रशासनाने उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्यामध्ये प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळेच एका शिफ्टमध्ये किमान 4 हजार रुपये उत्पन्न मिळालेच पाहिजे, अशी सक्ती वाहक आणि चालकांना करण्यात आली आहे. या उत्पन्नामध्ये घट झाल्यास संबधित कर्मचाऱ्यांना फिक्‍स ड्युटी न देणे तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला असून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

मात्र, पुणे शहर आणि उपनगराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ही बाब शक्‍य नसल्याचे इंटकने स्पष्ट केले आहे. तसेच उत्पन्न वाढीसाठी बसथांब्यावरील खासगी रिक्षा, ओला, उबेरच्या गाड्या तसेच अन्य पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने कारवाई करावी, तसेच प्लॅनिंग ऑफिसरची नेमणूक करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावे, त्या माध्यमातून बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे, असे केल्यास उत्पन्नवाढीस आणखी मदत होणार आहे, असा दावा इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि सरचिटणिस नुरुद्दीन इनामदार यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)