शनिवारवगळता 6 दिवस मिळणार सेवा
पुणे – पुणे ते भोपाळ आणि भोपाळ ते पुणे मार्गावर सुरू होणाऱ्या विमानसेवेच्या वेळा एअर इंडियाने जाहीर केल्या आहेत. ही सेवा येत्या 30 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पुणे विभागाने ट्विटरद्वारे जाहीर केली.
पुणे विमानतळ हे देशातील पहिल्या दहा विमानतळांपैकी महत्त्वाचे विमानतळ आहे. या विमानतळावरील प्रवासी संख्येमध्ये गेल्यावर्षी पेक्षा सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे विमानतळावरील प्रवाशांची वार्षिक संख्या सुमारे 82 लाखांच्या पुढे गेली आहे. तर विमानतळाहून दररोज सुमारे दीडशे विमानांची ये-जा होते.
हवाई वाहतूक करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे विमानांची संख्या आणि फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने एआय 481 आणि एआय 482 या विमानांची सेवा येत्या 30 मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी भोपाळहून सकाळी 10.45 वाजता विमानाचे उड्डाण होणार आहे. तर पुण्याहून भोपाळसाठी दुपारी 12.05 वाजता उड्डाण होणार आहे. ही सेवा शनिवार सोडून अन्य दिवशी वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांमुळे पुणे विमानतळ प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. जेट एअरवेज आर्थिक संकटात सापडल्यामुळे स्थगित झालेली विमानसेवा, अनेक विमान उड्डाणांना विलंब, वारंवार विमानांमध्ये होणारा तांत्रिक बिघाड आदी वारंवार घडणाऱ्या घटनामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, नव्याने सुरू होणाऱ्या विमानसेवेबाबत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.