बोगस संख्या दाखवून अनुदान लाटणाऱ्यांना चाप
मोबाइल ऍपद्वारे जनावरांसह मालकांचीही होणार नोंद
पुणे – चारा छावणीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणालीचा आधार घेतला आहे. त्यानुसार आता चारा छावणीमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहे. तसेच दिवसातून एकदा बारकोड स्कॅन करून त्यांची मोजणी करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जनावरांची बोगस संख्या दाखवून अनुदान लाटण्याच्या प्रवृत्तीला आळा बसणार आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासनाने आवश्यकतेनुसार चारा छावणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातही चारा छावणी सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनीही मान्यता दिली आहे.
चारा छावणी मध्ये बोगस जनावरांची संख्या दाखवून पैसे लाटल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. यापार्श्वभूमीवर शासनाने यंदा खबरदारी घेतली असून चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. चारा छावणी चालक मोबाइल ऍपद्वारे जनावरांची व त्यांच्या मालकांची नोंदणी करणार आहे. चारा छावणीसाठी हे ऍप वापरणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर चारा छावणीमधील जनावरांच्या कानामध्ये बार कोड असलेले टॅग लावण्यात येणार आहे. याआधारेच चारा छावणी चालकांना अनुदान देण्यात येणार आहे.