पुणे – बालेवाडी ‘ट्रान्झिट हब’ यार्डातच!

काम रखडणार : जागा देण्याचा प्रस्ताव तीन महिने पुढे


स्मार्ट सिटी प्रकल्पाला भाजपचाच सुरूंग

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “ड्रीम प्रोजेक्‍ट’ समजल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला महापालिकेतील सत्ताधारी भाजपनेच सुरूंग लावला आहे. या प्रकल्पांसाठीच्या योजनांना जागा देण्यास प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपकडूनच चालढकल केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (पीएससीडीसी) बालेवाडीतील मल्टिमॉडेल ट्रान्झिट हब देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने तीन महिन्यांसाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे एका बाजूला मेट्रोसाठी एका रात्रीत जागा देण्यास तयार होणारी महापालिका दुसऱ्या बाजूला सापत्न वागणूक देणे सुरूच असल्याचे चित्र आहे.

बालेवाडी येथील जकात नाक्‍याच्या जागेवर “ट्रान्झिट हब’ प्रस्तावित आहे. ही जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात असली, तरी तेथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) स्वरूपात “ट्रान्झिट हब’ विकसित करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीने केले होते. त्यासाठी, स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्यात आले होते. जागतिक स्तरावरील अनेक नामांकित कंपन्यांनी “ट्रान्झिट हब’साठी प्रतिसाद दिला आहे. ही जागा अद्याप स्मार्ट सिटीच्या ताब्यात नसल्याने त्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव तीन महिन्यांसाठी पुढे ढकलला. त्यामुळे, “ट्रान्झिट हब’च्या प्रक्रियेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.

असा आहे “ट्रान्झिट हब’
बालेवाडीतील प्रस्तावित “ट्रान्झिट हब’मध्येही मेट्रो, एसटी, जलद बस वाहतूक (बीआरटी) आणि रिक्षा-टॅक्‍सी अशा सर्व वाहन सेवा एकत्रित केल्या जाणार होत्या. त्याशिवाय, येथे निर्माण होणाऱ्या जागेचा व्यावसायिक वापर करून त्यातून दीर्घकालीन कराराद्वारे पालिका, स्मार्ट सिटीला उत्पन्न प्राप्त होणार होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नियोजन याच ठिकाणी करण्यात आले होते. शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांतील मल्टिमॉडेल हबचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

“ट्रान्झिट हब’साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; पण जागाच ताब्यात नसल्याने ही प्रक्रिया पुढे गेलेली नाही. “पीपीपी’ स्वरूपात ही जागा विकसित करायची असल्याने केवळ स्मार्ट सिटीलाच नाही, तर महापालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न मिळणार होते. मात्र, अद्याप जागा देण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याने यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)