पुणे – त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून होणार लेखापरीक्षण

पुणे – गेल्या वर्षभरात महसुलात तब्बल तीस टक्‍क्‍यांनी घट झाल्याने एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. त्यामुळे हा भार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे कुंपणच शेत खात असल्याने महामंडळावर ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी दरवर्षी त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून कारभाराचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून मावळत्या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने स्वत:च्या कारभारात आमूलाग्र बदल केला आहे. ताफ्यात शिवशाही, अश्‍वमेध, हिरकणी आणि स्लिपर कोच बसेस आल्यानंतर प्रवासी महामंडळाच्या बसेसकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे महसुलात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, असे असतानाही महसूलात तीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. याची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे.

हा तोटा कमी करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आलेले नाही. विशेष म्हणजे बाजारात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या स्पेअरपार्टसची खरेदी करताना अव्वाच्या सव्वा किंमती मोजल्या जात आहेत, त्यामध्ये प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदार अथवा एजन्सीजमध्ये मिलिभगत असल्याचे महामंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे हा आर्थिक कारभार सांभाळताना महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यातूनच महामंडळावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला असून बहुतांशी ठेकेदारांची देणी थकली आहेत. या ठेकेदारांनी महामंडळाकडे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.

वास्तविक महामंडळाच्या कारभाराचे दरवर्षी लेखा परीक्षण करण्यात येते. मात्र, हे लेखा परीक्षण महामंडळाच्या अखत्यारीत होत असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप होत असतो. परिणामी त्यामध्ये पारदर्शकता नसल्याने ते बहुतांशी प्रमाणात महामंडळाच्याच बाजूने असते, त्यामुळे यापुढील कालावधीत हे लेखा परीक्षण त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून आगामी काळात त्यासंदर्भात आणखी कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील मुक्कामी बसेसची तपासणी करणार
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत मुक्कामी बसेसच्या माध्यमातून महामंडळाला अपेक्षित महसूल मिळत आहे. मात्र, या महसूलाला गळती लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुक्कामी बसेसची तिकिट तपासणीसांकडून तपासणीच होत नसल्याने काही वाहक त्यामध्ये गफला करत आहेत, विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बसेसमध्ये असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. ही बाब महामंडळाच्या निदर्शनास आली असून त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी या बसेसमध्ये साध्या वेषातील तिकिट तपासणीस बसविण्यात येणार असून ते वाहकाच्या कारभारावर नजर ठेवणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)