पुणे – हवेतील प्रदूषणकारी घटकांमध्ये वाढ

आरोग्याची समस्या उद्‌भविण्यासोबतच श्‍वसन आजारांमध्ये वाढ

पुणे – शहरातील थंडीचा पारा वाढण्याबरोबरच हवेतील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील हवा प्रदूषित होत असून नागरिकांना आरोग्याची समस्या उद्‌भविण्याची विशेषत: श्‍वसनाचा त्रास होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
वातावरणातील गारवा वाढल्यामुळे शहरात थंडीची लाट आली आहे. मात्र, या थंड वातावरणामुळे हवेच्या प्रदूषणातदेखील वाढ होत आहे. जमिनीजवळील हवा तापली की हलकी होऊन ती आकाशाच्या दिशेने वर जाते. पण थंडीत हवा स्थिर असते, त्यामुळे हवेत मिसळणारे धूलिकण वर जात नाहीत, ते जमिनीलगतच राहतात. त्यामुळे थंडी वाढली की प्रदूषणाचे आकडे वाढतात. शहरात रस्त्यांवरील वाहनांमुळेच सर्वाधिक हवेचे प्रदूषण होते. थंडीमध्ये ते अजून वाढलेले दिसते.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या “सफर’तर्फे शहराच्या विविध भागांत दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हवेतील सूक्ष्म धूलिकण (पार्टीक्‍युलेट मॅटर 10), अतिसूक्ष्म धूलिकण (पी.एम 2.5), कार्बन डायऑक्‍सॉइड, नायट्रोजन अशा घातक वायूंची मोजणी केली जाते. यात प्रत्येक वायूचे प्रमाण समाधानकारक, मानकापेक्षा जास्त, धोकादायक आणि अतिधोकादायक असे शेरे दिले जातात. संस्थेच्या पाहणीत थंडीमुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये धक्‍कादायक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून पुण्यात तापमानाचा पारा घसरला आहे. कडाक्‍याच्या थंडीमुळे धूलिकण हवेत साठून राहात आहेत. सफर संस्थेच्या पाहणीनुसार पुण्यातील “पीएम 10’चे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 141 इतके आहे. तर “पीएम 2.5’चे प्रमाण 74 इतके आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीतही हवेतील या दोन घातक प्रदूषकांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढले असून श्‍वसनाचे, हृदयविकार झालेले नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हवा धोकादायक असल्याचे भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या “सफर’ या विभागाने स्पष्ट केले आहे.

पीएम 10 वाढण्याचे प्रमुख कारणे :
– वाढते शहरीकरण
– वाहनांची सतत होणारी वर्दळ
– धूलिकण

परिणाम :
– डोळ्यांची जळजळ होणे
– त्वचेच्या समस्या
– श्‍वसनाचे विकार
– फुफ्फुसाच्या कामात अडथळा निर्माण होणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)