पुणे – मद्यपी कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर

पुणे – महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, वाहन चालक तसेच अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कामाच्या वेळेत मद्यपान केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांची आता नियमित ब्रेथ ऍनलाईझरद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षा विभाग आणि अतिक्रमण विभागासाठी प्रत्येकी सहा ब्रेथ ऍनलाईझर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सुरक्षा विभागात सुमारे 1500 कर्मचारी असून सुमारे 900 वाहक तर अतिक्रमण विभागाचे सुमारे 200 कर्मचारी आहेत.

महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या ताफ्यात सुमारे 1500 हून अधिक सुरक्षा रक्षक आहेत. महापालिकेच्या इमारती, शाळा, कार्यालये तसेच पाणीपुरवठा केंद्रांसह आवश्‍यक ठिकाणी यांची नेमणूक केली जाते. मात्र, वारंवार अनेक सुरक्षा रक्षक दारू पिऊन कामावर येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी असलेले कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या शिवाय, अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांबाबतही तक्रारी असून अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाईस गेल्यानंतर अनेकदा मद्यपी त्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार पोलिसांसमोरच करतात, त्यावेळी या नागरिकांची तपासणी करण्यासाठी या मशीन वापरात येणार आहेत. तसेच, सुरक्षा विभागाच्या पथकाकडून रात्रीच्या वेळी शहरातील सुरक्षा रक्षकांची तपासणी केली जाते. यावेळी या मशीनद्वारे त्यांचीही नियमित तपासणी केली जाणार आहे.

वाहन चालकांचीही तपासणी
महापालिकेच्या अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसह महापालिकेने ठेकेदारांकडून शहरातील कामकाजासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या गाड्यांचे वाहन चालक दिवसाही मद्यपान करत असल्याचे वारंवार आढळून आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत महापालिका प्रशासनाकडून या चालकांचीही या मशीनद्वारे नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)