पुणे – विमानाने उत्तरप्रदेशातून येत पुण्यात घरफोडी

“हायटेक’ आंतरराज्यीय टोळीचा कोंढव्यात पर्दाफाश


पुण्यातील रिक्षाचालक साथीदारासोबत लागेबांधे उघड

पुणे – घरफोडी गुन्ह्याचा तपास करत असताना, आरोपींनी ऑटो रिक्षाचा वापर केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून कोंढवा पोलिसांना समजले. मात्र, रिक्षाचा क्रमांक अस्पष्ट असल्याने अधिक माहिती मिळवत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी उत्तरप्रदेशातून विमानाने, तर त्याचे साथीदार रेल्वेने पुण्यात दाखल होत. यानंतर पुण्यातील रिक्षाचालक साथीदारासोबत घरफोड्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपींनी केलेले चार गुन्हे उघडकीस आले असून 10 लाखांच्या मुद्देमालापैकी 4 लाख 68 हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

वाहिद खुर्शिंद मन्सुरी (वय-33, रा. निगडी), रियासत रियाजुद्दीन मन्सुरी (वय-28,रा.भोसरी, मु.रा.बिजनोर,उत्तरप्रदेश), रिजवान निजामुद्दीन शेख (25,रा.अजमेर,राजस्थान), फैसल जुल्फीकार अन्सारी (22), मोहम्मद सलमान झुल्फकार अन्सारी ऊर्फ सलमान अन्सारी (27), नफासत वहीद अन्सारी (29, तिघेही रा.उत्तरप्रदेश), मुशरफ यामीन कुरेशी (35,रा.निगडी) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात परिमंडळ-5चे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड म्हणाले, “कोंढवा येथील नरेश पुरुषोत्तमलाल मल्होत्रा (वय-61) व शक्ती शिवाजी ननवरे (35) यांचे फ्लॅटमध्ये दि.15 जानेवारी रोजी दिवसा घरफोडी होऊन 71 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले. याच दिवशी निगडी व वाकड परिसरातही घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गुन्हा करताना तोंडाला रुमाल बांधून घरफोडी करत असल्याचे दिसून आले. तसेच गुन्ह्यावेळी एका ठिकाणावरुन दुसरीकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर रिक्षाचे पुढील बाजूस 313 हा क्रमांक हिरव्या रंगात दिसत होता. मात्र, उर्वरित क्रमांक अस्पष्ट होता. त्यावरुन निगडी येथील रिक्षाचालक वाहित मन्सुरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने तीन साथीदारांसोबत घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी उत्तरप्रदेश व राजस्थान येथे पथक पाठवून रियासत मन्सुरी, रिजवान शेख, फैसल अन्सारी यांना जेरबंद केले. ‘

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार म्हणाले, “चोरीचा पैसा ऐषोआराम व मौजमजेवर आरोपी खर्च करत होते. विमान प्रवासासाठी ही चोरीच्या पैशांचा वापर होत होता. चोरीचा संशय येऊ नये, यासाठी ते विमानाने प्रवास करत होते. तर चोरी केल्यानंतर मुद्देमाल त्यांचे साथीदार रेल्वेने घेऊन जात होते. विमानाने प्रवास करुन पुणे शहरात येऊन चोरी करणारे मोहम्मद अन्सारी, नफासत अन्सारी यांना त्यांचा पुण्यातील रिक्षाचालक साथीदार मुशरफ कुरेशी पुणे विमानतळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर, रेल्वेतून येणाऱ्या त्यांचे साथीदारांजवळ शस्त्र असत. पुण्यात आल्यानंतर तीन ते चार दिवस थांबून घरफोड्या करून ते पसार होत असत. चोरीचे दागिने सराफाला त्यांनी विक्री केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी सराफाचीही चौकशी करण्यात येत आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)