पुणे – एसटी घालणार एजंटगिरीला आळा

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्यातील एसटी स्थानकांच्या आगारात खासगी बसचालकांच्या एजंटानी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे, त्यांच्या माध्यमातून एसटीचे प्रवासी पळविले जात असून त्यामुळे महामंडळाचा महसूल घटत चालला आहे. या प्रकाराची एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या एजंटाना लगाम घालण्यासाठी राज्यातील सर्व आगार आणि महत्त्वाच्या स्थानकांवर साध्या वेषातील कर्मचारी नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. असे एजंट जाळ्यात अडकल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे.

एसटी महामंडळाचे राज्यात 254 आगार आहेत, तर किमान बाराशे महत्त्वाची छोटी मोठी स्थानके आहेत. महामंडळाच्या 20 हजार बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात, या माध्यमातून महामंडळाला दररोज किमान 25 ते 30 कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महामंडळाच्या या महसुलाला खासगी बसचालक आणि त्यांच्या एजंटांनी गळती लावली आहे. हे एजंट बिनधास्तपणे महामंडळाच्या आगारात अथवा महत्त्वाच्या स्थानकांमध्ये घुसून प्रवाशांना कमी दरात इच्छित स्थळी नेण्याचे आमिष दाखवित आहेत, प्रत्यक्षात त्यांच्या वाहनांमध्ये प्रवासी बसल्यानंतर त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे आकारण्यात येत असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामंडळाच्या वतीने मध्यतंरीच्या काळात या एजंटगिरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले असले तरी प्रत्यक्षात ही एजंटगिरी अपेक्षेच्या प्रमाणात बंद झालेली नाही. विशेषत: उन्हाळा, दिवाळी, नाताळ आणि सलगच्या सुट्ट्यांच्या कालावधीत ही एजंटगिरी अधिकच फोफावत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याशिवाय या एजंटांवर नरमाईची कारवाई होत असल्याने त्यांच्या माध्यमातून पुन्हा अशीच एजंटगिरी सुरू होत होती, त्यामुळे या एजंटगिरीचा समूळ नायनाट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार यापुढील कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या स्थानकांवर साध्या वेषातील कर्मचारी नेमण्यात येणार असून या एजंटावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा एसटी महामंडळाचे व्यवस्थापक माधव काळे यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

कर्मचाऱ्यांनाही देणार तंबी!
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महत्त्वाच्या स्थानकांवर खडा पहारा असतो. असे एजंट, संशयित प्रवासी आणि भुरटे चोर यांना रोखण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, हे कर्मचारीच अशा एजंटगिरीला खतपाणी घालत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या हालचाली कैद झाल्या आहेत, यासंदर्भात त्यांना महामंडळाच्या वतीने समज देण्यात आली होती. मात्र, यापुढील कालावधीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)