मुलभूत प्रश्न सुटेनात : तिसऱ्या रेल्वे लाइनचे कामही “यार्डा’तच
लोणावळा मार्गावर फेऱ्या वाढविण्याची मागणी कायम
दौंड मार्गावर नियमित लोकल सुरू होणार तरी कधी?
पुणे – पुणे ते लोणवळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नांवर तोडगा काढून त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या लोकल सेवेने नुकतेच 42 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. एवढी वर्षे सेवा सुरू असूनही, प्रवाशांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे ते लोणावळा या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि महिला मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मात्र, या मार्गावरील काही प्रश्न 42 व्या वर्षांत कायम असून त्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या मार्गावर लोकलच्या रोज 42 फेऱ्या होतात. सुमारे 1 लाख प्रवासी यादरम्यान प्रवास करतात. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणारा मनस्ताप कमी व्हावा, यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत आहेत. या मार्गावरील लोकलची संख्या आणि वारंवारता वाढवावी या मागणीसह, पुणे ते लोणावळा या मार्गावरील लोकल खोपोली, पनवेल पर्यंत न्यावी. त्याचबरोबर लोणवळा ते पुणे लोकल दौंडपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.
तिसरी रेल्वे लाइन आवश्यक
गेली 41 वर्षे सेवा देणाऱ्या पुणे-लोणावळा लोकलचा विकास होणे अपेक्षित होते. रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने नवीन लाइनचे काम वेगाने करुन लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी. रेल्वेसाठी आवश्यक असणारी तिसरी लाइन रेल्वे प्रशासन लवकर का पूर्ण करत नाही, असा सवाल रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला.
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवास जास्तीत जास्त सुखकर व्हावा, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. पुणे- लोणावळा मार्गावर धावणारी लोकल सहा डब्यांची होती. कालांतराने ती 12 डब्यांची झाली आणि सध्या ही लोकल लवकरच 15 डब्यांची करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय शिवाजीनगर स्थानकात नवीन “लाइन’ टाकण्याचे काम सुरू असून, त्या मार्गावर अतिरिक्त लोकल करण्याचा प्रशासनाचा मानस आहे
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
दररोजची आकडेवारी
42
लोकलच्या फेऱ्या
1,50,000
दररोज प्रवास करणारे प्रवासी
या आहेत प्रवाशांच्या मागण्या :
– लोकलची संख्या वाढावी
– लोकलमध्ये ई-टॉयलेटची सुविधा करावी
– दर पाच मिनिटांनी लोकलची फेरी व्हावी
– ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा अद्ययावत करावी
– रेल्वे लाइनचे काम वेगाने करावे