पुणे – फुकट्यांवर लिपिकही करून शकणार कारवाई

पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णय


विनाटिकीट प्रवास करणाऱ्यांना बसणार आळा

पुणे – घर ते ऑफिस किंवा इतर ठिकाणी पीएमपीएमएल बसने प्रवास करताना फुकट प्रवास करणारा प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाच्या लिपिकांनाही देण्यात आला. फुकट्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून ही अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत प्रशासनाकडे तिकीट तपासणीसांची संख्या उपलब्ध नसल्याने फुकट्या प्रवाशांचे फावत आहे. त्यामुळे पीएमपी बसेसमधून प्रवास करताना कर्मचाऱ्यांना अनेकदा प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे जाणवते. परंतु, ते त्यावेळी काही करू शकत नव्हते. मात्र, आता प्रशासनाने दिलेल्या सुचनांनुसार लिपिक देखील तिकीटाची तपासणी करू शकणार आहेत.

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणाऱ्या पीएमपीएमएलच्या स्वत:च्या मालकीच्या आणि कंत्राटी पद्धतीने धावणाऱ्या सुमारे 1,800 पेक्षा अधिक बसेस आहेत. या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज जवळपास 10 ते 12 लाख इतकी असते. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गांवरच्या बसेसना प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत काही जण तिकीट न काढता प्रवास करतात. अशा प्रवाशांचा वाहकाला संशय आल्यास प्रवासी पास, ओळखपत्र असल्याचे कारण देत अरेरावी करण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर लिपिकांनाच तिकीट तपासणीचे अधिकार देण्यात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरामध्ये तिकीट तपासणीसाठी पीएमपीची सात पथके कार्यरत आहेत. तर दररोज पीएमपी बसने कामावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लिपिकांची संख्या 350 आहे. या नव्या निर्णयामुळे फुकट्या प्रवाशांना आळा बसणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)