पाण्याचे संकट गंभीर : महापालिका प्रशासन मात्र संथच
पुणे – शहरातील पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने महापालिकेकडून अनधिकृत नळजोड तसेच मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाईची मोहीम जानेवारी-2019 पासून उघडण्यात आली आहे. मात्र, गेल्या साडेतीन महिन्यांत अवघ्या 739 नळजोडांवर कारवाई करण्यात आली असून दिवसाला सरासरी अवघ्या 7 नळजोडांवर कारवाई केली जात असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मते शहरात सुमारे दीड लाख अनधिकृत नळजोड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनधिकृत नळजोड आणि कारवाईची स्थिती पाहता पालिकेचे संथकामकाज पुन्हा समोर आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्के कमी पाणीसाठा असल्याने पालिकेडून जानेवारी महिन्यापासूनच शहरात पाणी बचतीसाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, सिमेंट रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी न वापरण्यास, अनधिकृत नळजोड शोधून ते नळजोड तोडने तसेच पाणी खेचण्यासाठीच्या मोटारी जप्त करण्याची मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. ही जबाबदारी पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या लष्कर, बंडगार्डन, चतु:शृंगी, स्वारगेट एक आणि दोन आणि एसएनडीटी विभागाच्या अभियंत्यांच्या पथकावर देण्यात आली होती. या पथकाने दैनंदिन पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहात शहरात फिरून ही कारवाई केली असून गेल्या साडेतीन महिन्यांत सुमारे 739 नळजोडांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात फेब्रुवारीत 312, मार्च 250, एप्रिल 143 तर 15 मेपर्यंतच्या 34 कारवायांचा समावेश असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. प्रत्यक्षात ही आकडेवारी पाहिली असता, या सहा विभागांतील पथकांकडून दिवसाला सरासरी एक ते दोन अनधिकृत नळजोडांवर कारवाई होत असून ही केवळ नावासाठी केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारवाईचा दिखावूपणा…
महापालिकेकडून शहरात सुमारे 1 लाख 60 हजार अधिकृत नळजोड असल्याचे सांगण्यात येते. त्यात सुमारे 38 हजार व्यावसायिक नळजोड आहेत. तर उर्वरीत घरगुती असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी जेवढे अधिकृत नळजोड आहेत तेवढेच अनधिकृत असल्याचेही प्रशासनही कबूल करते. त्यामुळे अनधिकृत नळजोडांचा आकडा पाहता महापालिकेची ही कारवाई केवळ दिखावू पणा असल्याचे समोर येत आहे.