पुणे – बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी 8 प्रस्ताव अंतिम

महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीसह प्रशासनाच्या सात सदस्यांची नियुक्ती

पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी आलेल्या 26 प्रस्तावांमधील 8 प्रस्तावांची अंतीम निवड करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्वसनासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली 21 सदस्यांच्या समितीसह महापालिका प्रशासनाच्या सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने आचारसंहितेपूर्वी 5 ते 7 मार्च या तीन दिवसांत सर्व प्रस्तावांचे सादरीकरण तसेच माहिती घेऊन हे 8 प्रस्ताव अंतीम केले आहेत.

-Ads-

बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी प्रशासनाने नोंदणीकृत वास्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यात प्रामुख्याने, रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी प्रचलित डी.सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे. तसेच सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या नाट्यगृह इमारतीत आवश्‍यक सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी डिझाईन सादर करणे. या दोन बाबी होत्या. त्यानुसार, महापालिकेने दिलेल्या मुदतीत 52 जणांनी या विकसनासाठी प्रशासनास पत्र दिले आहे. मात्र, त्यातील प्रत्यक्षात 26 जणांचेच प्रस्ताव प्राप्त झाले होते. हे सर्व प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर न ठेवता त्या प्रस्तावांची पहिल्या टप्प्यातील छाननी महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या 7 सदस्यांच्या समितीने सलग तीन दिवस केली. त्यानंतर 8 प्रस्ताव अंतीम केले असून हे आठ प्रस्ताव महापौरांच्या समिती समोर ठेवले जाणार आहेत.

आचारसंहितेनंतर होणार अंतीम निर्णय
आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता असल्याने, महापालिका प्रशासनाने सलग तीन दिवस 26 प्रस्तावांची छाननी केली असली तरी, अंतीम आठ प्रस्तावांमधील दोन प्रस्तावांची निवड आता आचारसंहितेनंतरच होणार आहे. महापालिकेने यासाठी 21 सदस्यांची समिती नियुक्त केली असून त्यात पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह नाट्य, चित्रपट, साहित्य तसेच कला क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे या समितीची बैठक आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)