पुणे – उच्च शिक्षण संचालनायामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे 37 महाविद्यालयांतील 706 अर्ज महाडीबीटी पोर्टलच्या लॉगइनवर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी पोर्टलवर अर्ज प्रलंबित ठेवू नयेत, अशी सूचना पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिली आहे.
पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढही देण्यात आली आहे. आता 28 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोर्टलवर महाविद्यालयांचे लिपीक व प्राचार्यांच्या लॉगइनवर जास्त अर्ज प्रलंबित आहेत. संबंधित महाविद्यालयांनी या अर्जांची तपासणी करून पुढे अर्ज पाठविण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयांनी एकही अर्ज प्रलंबित ठेवू नये, असे आदेश बजाविण्यात आलेले आहेत.
सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना शिष्यवृत्ती व अन्य विविध योजनांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मंजूर झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती लवकर जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाचे मुख्य सचिव व संबंधित विभागाचे सचिव यांच्या स्तरावर सतत आढावा बैठका सुरू आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्याने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.