पुणे – 539 आरोग्य उपकेंद्रांना हक्काचे डॉक्टर

पुणे – जिल्ह्यात “आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 539 उपकेंद्रांना वैद्यकीय अधिकारी मिळणार असून, या योजनेंतर्गत गावातील नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय उपचारासाठी होणारी पायपीटही थांबणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकट करण्याचा शासनाचा मानस आहे. या केंद्रांमध्ये रुग्णांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सेवांबरोबरच औषधोपचार आणि प्रयोगशालेय तपासणी मोफत दिली जाणार आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 30 प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि 25 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनी म्हणून मंजुरी मिळाली आहे. तसेच 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 66 केंद्र आणि 539 उपकेंद्रापैकी 514 उपकेंद्राचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये करण्यास बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार 13 प्रकारच्या सेवा रुग्णांना या केंद्रामध्ये मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 13 सेवा मिळणार
1) प्रसुतीपूर्व व प्रसुती सेवा
2) नवजात अर्भक आणि नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा
3) बाल्य आणि किशोरवयीन आजार तसेच लसीकरण
4) कुटूंब नियोजन, गर्भनिरोधक आणि आवश्‍यक आरोग्य सेवा
5) संसर्गजन्य रोग नियोजन आणि सामान्य रोगांची बाह्यरुग्ण सेवा
6) संसर्गजन्य रोग नियोजन आणि तपासणी
7) असंसर्गजन्य रोग नियोजन आणि तपासणी
8) मानसिक आरोग्य नियोजन आणि तपासणी
9) कान, नाक, घसा आणि डोळे सामान्य आजारासंबंधीच्या सेवा
10) दंत आणि मुखरोग आरोग्य सेवा
11) वाढत्या वयातील आजार आणि परिहारक उपचार
12) प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा
13) योग सत्र

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, आरोग्य सभापती प्रवीण माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपकेंद्रांना वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 13 प्रकारच्या रुग्णसेवा देण्यात येणार असून, असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, दंत आणि मुखरोग यासह योग या विशेष सेवा उपलब्ध होणार आहेत. केवळ आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठीही जनजागृती केली जाणार आहे.
– डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)