पुणे – ‘शेतकरी सन्मान’चे जिल्ह्यात साडेपाच लाख लाभार्थी

संग्रहित फोटो

पुणे – प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पुणे विभागात सुमारे 23 लाख 87 हजार लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ही संख्या 5 लाख 37 हजार इतकी आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त (महसूल) प्रताप जाधव यांनी दिली.

केंद्र शासनाच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एका कुटुंबाला प्रति वर्षी सहा हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील रक्‍कम येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्याचा विचार केंद्र शासनाचा आहे. तीन टप्प्यात हे पैसे दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबाची सर्व ठिकाणची मिळून लागवडी लायक एकूण क्षेत्र दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत असलेले क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. तसेच, लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चे घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 6,323 गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली आहे.

जिल्हा निहाय लाभार्थी
पुणे 5 लाख 37 हजार
सातारा 6 लाख 37 हजार
सांगली 3 लाख 88 हजार
सोलापूर 4 लाख 90 हजार
कोल्हापूर 3 लाख 35 हजार

शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. गोळा केलेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. पुणे विभागात एकूण 28 लाख लाभार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त झालेली सर्व लाभार्थ्यांची माहिती पाच मार्चपर्यंत महाऑनलाईनने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.
– प्रताप जाधव, विभागीय आयुक्त (महसूल)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)