पुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’

Electricity

11 हजार 386 थकबाकीदारांचा पुरवाठा कायमस्वरुपी खंडित

पुणे – वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या व वारंवार आवाहन करूनही थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील जिल्ह्यातील 32 हजार 252 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 11 हजार 386 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात महावितरणकडून थकबाकीदारांविरुद्ध मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात झाली आहे. या मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी व हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे महावितरणच्या मासिक वीजबिलांचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या ध्येयाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत संबंधित थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडितच करण्याचे आदेश सर्व अधिकारी व जनमित्रांना देण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांतील वाढत्या थकबाकीची गंभीर दखल घेऊन थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयनिहाय थकबाकी व होणारी वसुली याचे दैनंदिन पर्यवेक्षण वरिष्ठ पातळीवरून सुरू करण्यात आले आहे.

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये थकबाकीदार असणाऱ्या पुणे शहरातील 14 हजार 355 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 4 हजार 694 जणांचा कायमस्वरुपी तर 9 हजार 650 जणांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 333 कायमस्वरुपी तर 6 हजार 505 तात्पुरता अशा एकूण 7 हजार 838 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याच्या मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, शिरूर, दौंड, भोर, बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्‍यांत देखील 5 हजार 359 कायमस्वरुपी तर 4 हजार 711 तात्पुरत्या अशा एकूण 10 हजार 70 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदाराने अनधिकृतपणे वीजवापर केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू
थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.23) व रविवारी (दि.24) फेब्रुवारीला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. याशिवाय घरबसल्या ऑनलाइन पेमेंटसाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाइल ऍपचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)