पुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले

कॅशिअर, कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पैशांची पेटीच पळवली

पुणे – पुण्यातील सेव्हन लव्हज चौकातील स्टेट बॅंकेच्या टिंबर मार्केट शाखेतून भरदिवसा 28 लाखांची चोरी झाली आहे. या शाखेतून चोरट्यांच्या टोळीने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कॅशिअर मागील पैशांची पेटीच उचलून नेली. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. स्थानिक पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर धाडण्यात आली आहेत. चोरी करतानाचे व पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना आढळून आले आहेत.

याप्रकरणी बॅंकेच्या वतीने वर्तिका प्रांशु श्रीवास्तव (35, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चोरीची घटना घडली. स्टेट बॅंकेच्या शाखेत सात ते आठ व्यक्ती एका मागोमाग शिरल्या. त्यांनी कॅशियरसह इतर काऊंटरवरील व्यक्तिंना बोलण्यात गुंतवून ठेवले. यानंतर कॅशियरच्या मागे पैशांनी भरलेली पेटी उचलून एक व्यक्ती बाहेर पडला. यानंतर त्याचे इतर साथीदारही एका मागोमाग बॅंकेतून निघून गेले. अन्य व्यक्तिंना पैसे देण्यासाठी कॅशियर मागे वळल्यानंतर रोकड असलेली पेटी जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या पेटीमध्ये तब्बल 28 लाख रुपये असल्याची माहिती बॅंकेकडून देण्यात आली.

चोरी करणारी टोळी बॅंकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपींनी पेटीतील पैसे काढून घेऊन ती टिळक रस्त्यावर टाकून दिल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, उमाजी राठोड आदींनी भेट दिली.

सात ते आठ व्यक्तींनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ही चोरी केली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत. चोरांनी थोड्याच अंतरावर पैसे काढून रिकामी पेटी टाकून दिल्याचे आढळले आहे. आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.
– शिरीष देशपांडे, उपायुक्त, गुन्हे

चोरीला गेलेली रक्‍कम
2000 दराच्या 486 नोटा, 500 दराच्या 3,127 नोटा, 200 दराच्या 531 नोटा, 100 दराच्या 1,666 नोटा, 1000 रुपयांची लोखंडी पेटी असा 28 लाख 9 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)