पुणे – बारावीच्या परीक्षेवर 252 भरारी पथकांचा ‘वॉच’

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न


विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रसंचालक आणि शिक्षकांना मोबाइल वापरण्यास बंदी

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत परीक्षा केंद्रावर “वॉच’ ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, शिक्षक या सर्वांनाच मोबाइल वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

बारावीची परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार असल्याने पारदर्शकपणे परीक्षा व्हाव्यात यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी विभागीय मंडळासह राज्य मंडळाने ठेवली आहे. कॉपीसारखे संभाव्य इतर सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकामधील जुने शिक्षक यंदा बदलण्यात येणार आहेत. या पथकाला पेपरच्या दिवशी सकाळी कोणत्या कोणत्या परीक्षा केंद्रांना भेटी द्यायच्या याबाबतचे नियोजन विभागीय मंडळाच्या स्तरावरून निश्‍चित करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पथकाला मनमानी कारभार करता येणार नाही. विभागनिहाय संवेदनशील केंद्रे निश्‍चित करून या केंद्रांवर बैठे पथक सज्ज ठेवण्यात येणार आहेत. या केद्रांच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथक, विशेष महिला भरारी पथकही नेमण्यात आलेली आहेत. विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारीही परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सर्वच परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, यासाठी कोणतीही सक्‍ती राज्यमंडळाकडून लागू करण्यात आलेली नाही. मोबाइल वापरण्यास सर्वांनाच बंदी घालण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांनाही मोबाइल ऐवजी लॅंडलाइन फोनचा वापर करावा लागणार आहे.

परीक्षेच्या 9 भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी दोन्हींवर बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे.

वेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात 11 ते 2 तर, दुपारच्या सत्रात 3 ते 6 यावेळेत पेपर होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात पेपरच्या आधी अर्धा तास उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे वाचन व आकलन व्हावे यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी एकूण 60 समुपदेशकांच्या नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यमंडळाच्या स्तरावर 10, प्रत्येक विभागीय मंडळामध्ये 1, जिल्हानिहाय एक समुपदेशक नेमण्यात आलेले आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 यावेळे समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गासाठी 25 प्रश्‍नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकीट देण्यात येणार आहे. दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊनच पर्यवेक्षकांना हे पाकीट उघडावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावरील परीक्षेसाठीची आवश्‍यक ती तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षांचे बैठक क्रमांक टाकण्यात आले असून परीक्षाबाबतच्या महत्त्वाच्या सूचनांचे फलकही आवारात लावण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावर जाऊन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था व सूचनांचे वाचनही केल्याचे चित्र पहायला मिळाले.

यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या छायाचित्रासह गुणपत्रक उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले आहे.

मुंबईच्या एका विद्यार्थीनीला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास खास परवानगी
राज्याच्या मुंबई विभागीय मंडळातील मुंबई येथील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी या राज्यातील एकमेव विद्यार्थीनीला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास खास परवानगी राज्य मंडळाने दिली आहे. ही दिव्यांग विद्यार्थींनी अध्ययन अक्षम असल्याबाबत डॉक्‍टरांचे प्रमाणपत्रही मिळालेले आहे. तिने परीक्षेची तयारी आयपॅडवर केली आहे. त्यामुळे तिला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास परवानगी देण्यात आली असून तिला स्वत:चा आयपॅड आणावा लागणार आहे. या आयपॅडची तपासणी करूनच तो तिला परीक्षेला वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. तिला आवश्‍यकता भासल्यास रायटरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

सुपरव्हिजनसाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवणार
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षा कालावधीत असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यांनी सुपरव्हिजन करणार नाही, असे लेखी राज्यमंडळाला कळविलेले नाही. दरम्यान, सुपरव्हिजनसाठी पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास राज्यमंडळाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

– परीक्षेसाठी पारदर्शक व्यवस्था
– विद्यार्थ्यांना 30 मिनिटे आधीच केंद्रांवर उपस्थित राहवे लागणार
– विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधीच प्रश्‍नपत्रिका मिळणार
– उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची छपाई
– केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे लावावे लागणार
– संवेदनशील केंद्रांवर खास यंत्रणा
– वरिष्ठ अधिकारीही केंद्रांना भेटी देणार
– विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशकांच्या नियुक्‍त्या
– विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइन
– व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)