पुणे – जिल्ह्यात 233 मतदान केंद्र वाढणार

प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे : 2 लाख नव मतदार वाढले

पुणे – जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नाव नोंदणी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2 लाख नव मतदार वाढले आहेत. मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात 233 मतदान केंद्र वाढणार असून त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्यावत करण्याची मोहिम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये सुध्दा मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहिम राबविली होती. तसेच, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विशेष मोहिम राबविली होती. या सर्व मोहिमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले. या सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

यंदा जिल्ह्यात 7 हजार 899 मतदान केंद्रे
मतदारांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात चौदाशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र, तर ग्रामीण भागात बाराशे मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 7 हजार 666 होती. आता जिल्ह्यात एकूण 233 मतदान केंद्रे वाढणार असल्याने एकूण मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 899 होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)