राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडे प्रस्ताव सादर
पुणे – राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडे 23 तंत्रनिकेतन संस्था अर्थात पॉलिटेक्निक कॉलेजने संस्था बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून 23 तंत्रनिकेतनच्या संस्था बंद होणार असल्याची चिन्हे आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाने विविध पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांकडून लोकेशनमध्ये बदल करणे, संस्था कायमस्वरुपी बंद करणे, पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार राज्यातील तब्बल तेवीस तंत्रनिकेतन संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत.
पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या ज्या संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्या संस्थांची तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयीन स्तरावर तपासणी करण्यात आली आहे. परंतु, या संस्थांनी पाठविलेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या संदर्भातील कागदपत्रे येत्या 22 मार्चपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयास सादर करण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने संस्थांना दिले आहेत. त्यानंतरच संबंधित महाविद्यालयांना शासनामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.
पुण्यातील संस्थेचाही समावेश
बंद होणाऱ्या तंत्रनिकेतनमध्ये पुणे, मुंबई, जयसिंगपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, जळगाव, नाशिक, वर्धा, परभणी, लातूर, यवतमाळ आदी शहरांतील संस्थांचा समावेश आहे.
फार्मसी प्रवेशासाठी पसंती वाढली
राज्यात गेल्या काही वर्षांत फार्मसीची मागणी वाढली असून, फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पसंती वाढली आहे. त्यामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 18 पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा प्रस्तावच संबंधित संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयास पाठविला आहे. यामध्ये पुण्यातील तब्बल सहा संस्था आहेत, तर उर्वरित 12 संस्था या अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, जळगाव, वर्धा, नागपूर, धुळे या शहरांतील आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.