पुणे – 114 अधिकारी लष्करी वैद्यकीय सेवेत

53 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ : हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

पुणे – सकाळचे प्रसन्न वातावरण… लष्करी बॅण्डच्या सुरावर होणारे शिस्तबद्ध संचलन…संचलनानंतर सन्मानपूर्वक देण्यात आलेले सैन्याधिकारी आणि डॉक्‍टर हे पद आणि त्याचवेळी आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी अशा अनोख्या वातावरणात लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या 53 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ झाला. गेल्या चार वर्षांत केलेली मेहनतीची फलश्रुती मिळाली असल्याचे आनंददायी भाव यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

महाविद्यालयाच्या 53 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ मंगळवारी लष्करी महाविद्यालयाच्या परेड ग्राऊंडवर उत्साहात झाला. याप्रसंगी आयोजित संचलनाचे निरीक्षण लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी केले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल, महाविद्यालयाचे संचालक सर्जन व्हाइस ऍडमिरल रवी कालरा, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर उपस्थित होते. यंदा 114 अधिकारी लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाले. यामध्ये 90 हे पुरूष अधिकारी तर 24 या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 95 अधिकारी स्थल सेनेत, 14 वायुदलात तर 5 नौदलाच्या सेवेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी महाविद्यालयाच्या “अर्जन’ या एअर वॉरिअर ड्रील टीमतर्फे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

“वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. लष्करी वैद्यकीय सेवेत हे नवे बदल स्वीकारून त्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे हे भविष्यातील आव्हान असणार आहे. त्या दृष्टीने लष्कराने पावले उचलण्यास सुरुवात केली असून तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आधुनिकतेशी ताळमेळ साधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रीया या सारख्या अनेक नव्या तंत्रज्ञानाने नव्या पिढीतील डॉक्‍टरांना प्रशिक्षित केले जात आहे.’
– लेफ्टनंट जनरल पुरी


“लहाणपणापासून लष्करी वैद्यकीय सेवेत यायचे स्वप्न होते. वडिल लष्करात असल्यामुळे सातत्याने याबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि जिद्द चिकाटीमुळे मी माझे स्वप्न पूर्णकरू शकलो. आज केवळ वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचाच नव्हे तर तुकडीच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचाही आनंद होत आहे. हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. भविष्यात लष्करी वैद्यकीय सेवेत संशोधन करण्यासाठी ऑर्थोपिडीक्‍स क्षेत्रात अभ्यास करणार आहे.’
– लेफ्टनंट गुरींदर सिंग, परेड कमांडर


“मी मुळची बिहारमधील पालीगंज शहराची रहिवासी आहे. माझे बाबा नौदल अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासूनच मला सैन्याच्या वातावरणाबाबत माहिती आणि कुतुहल दोन्ही होते. मात्र, मला डॉक्‍टर बनण्याची आवड होती. एकाचवेळी डॉक्‍टर आणि लष्करी अधिकारी असा दुहेरी सन्मान देणारी लष्करी वैद्यकीय महाविद्यालय ही एकमेव संस्था आहे. त्यामुळेच मी आधीपासूनच या संस्थेत येण्याचे निश्‍चित केले होते. गेल्या चार वर्षांत खूप काही शिकायला मिळाले. येथील शिस्त, शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमातही सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या सर्वांगिण व्यक्तीमत्त्वाचा विकास झाला. भविष्यात औषधनिर्माण क्षेत्रात अभ्यास करून रुग्णांची सेवा करायची आहे.’
– लेफ्टनंट प्रियंका गुप्ता, राष्ट्रपती सुवर्ण पदकाची मानकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)