पुणे – जिल्ह्यातील अनुसूचित जाती, आदिवासी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना अंतर्गत लाभधारकांना पशुखाद्यावर 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. 2019-20 डीबीटीमध्ये या योजनेअंतर्गत हे दुधाळ गायी किंवा म्हशींना भाकड कालावधीत शंभर टक्के अनुदानावर पुशखाद्य पुुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या खरेदी समितीने निश्चित केलेल्या दरानुसार खरेदी केलेल्यांनाच याचे अनुदान मिळणार आहे. 23 रुपये प्रतिकिलो या प्रमाणे गायासाठी 150 किलो तर म्हशीसाठी 225 किलो पशुखाद्य मुदतीत खरेदी केलेल्यांना अनुदान बॅंक खात्यावर जमा केले जाणार आहे. खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदेकडून निश्चित केलेल्या कार्यपद्धतीने तपासली जाणार आहे. त्या साहित्यात गुणवत्ता असल्याचे स्पष्ट झाल्यावरच हे अनुदान जमा होईल. यामध्ये 740 अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर 376 अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ होणार आहे.