प्रचार लोकसभेचा; पेरणी विधानसभेची

विद्यमान आमदारांसह इच्छुक सरसावले; चिन्ह बिंबवण्याची संधी

नगर – जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेतच, पण विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी या प्रचारातून विधानसभेची पेरणी सुरू केली आहे. पावसाळा संपताच विधानसभेचे बिगुल वाजणार असल्याने प्रचारावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मतदारसंघात वातावरणनिर्मिती करून लोकांच्या मनावर चिन्ह बिंबवण्याची संधी मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शमते न शमते तीच विधानसभेची तयारी सुरू होणार आहे. 23 मेला लोकसभेचा निकाल लागून मे महिन्याच्या अखेरीस केंद्रातील सरकार सत्तेवर बसेल. महिन्याभरात विधानसभेची तयारी सुरू होईल आणि साधारणता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून आतापासूनच संपर्क ठेवला तर पुढे थोडे सोपे जाईल, असा व्होरा असल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी मतदारांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे “चिन्ह’ मतदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

पालकमंत्री प्रा.राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे, या भाजपच्या, राहुल जगताप या राष्ट्रवादीच्या, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात या आमदारांची ही रंगत तालीमच राहणार आहे. थेट पक्षाचे चिन्ह घेऊन ही मंडळी लोकांसमोर जाणार असल्याने येथे कोण किती पाण्यात आहे, याचा अंदाज येणार असून संपर्क हाच त्यांचा फायदा होणार आहे. या संपर्क मोहिमेचा फायदा उठवण्यासाठी याच मतदारसंघांतील विरोधी इच्छुकांनीही कंबर कसली आहे; पण मित्रपक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह एक आणि आपले विधानसभेचे चिन्ह दुसरे, असे त्रांगडे विजय औटी, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड यांचे झाले आहे.

आमदार संग्राम जगताप व आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार आहे. तर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात लक्ष देणार नाही अशी भूमिका घेतल्याने ते त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचारात उतरणार नाही. यासह विरोधी चंद्रशेखर घुले, प्राजक्‍त तनपुरे, सुजित झावरे, निलेश लंके, रोहित पवार, बबनराव पाचपुते, मधुकर तळपाडे यांनी चिन्ह बिंबवण्याची संधी मिळाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)